एकीकडे मिळेना हंडाभर पाणी, शेजारी रस्त्यावर सडा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सामुंडी गावात जलजीवन मिशन योजना राबवली गेली. मात्र, महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गावाजवळची विहीर आटली असून, टँकरने पाणी पुरवले जाते. हे पाणीही अशुद्ध असते. दुसरीकडे, त्र्यंबकेश्वर-देवगाव रस्त्याच्या कामावर टँकरने भरपूर पाणी फवारले जात आहे. एका बाजूला पाण्याची तीव्र टंचाई, तर दुसऱ्या बाजूला पाण्याचा अपव्यय हे चित्र विदारक आहे.

एकीकडे मिळेना हंडाभर पाणी, शेजारी रस्त्यावर सडा

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सामुंडी येथे जलजीवन मिशन योजना झाली. मात्र, महिलांच्या डोक्यावरील हंडा दूर झाला नाही. गावाजवळ असलेल्या विहिरीच्या पाण्यावर येथील वस्ती अवलंबून आहे. या विहिरीने तळ गाठला असून, कधीतरी चार-सहा दिवसांनी विहिरीत टँकरने पाणी टाकले जाते. महिला ते अशुद्ध पाणी हंडे भरून नेतात. पाणी आहे तोपर्यंत भर उन्हात पाणी वाहतात. विहिरीतील पाणी संपल्यावर पुन्हा टँकर लवकर येणार नाही म्हणून पाणी भरण्यासाठी गर्दी करतात. पाण्याचे असे दुर्भीक्ष्य निर्माण झालेले असताना विहिरीच्या जवळच त्र्यंबकेश्वर-देवगाव रस्त्याचे काम सुरू आहे. रस्त्यावर माती मुरूम टाकण्यात येत आहे. त्या रस्त्याच्या कामावर टँकरने पाण्याचा सडा टाकण्यात येत आहे. एकीकडे महिला घेटभर पाण्यासाठी धावाधाव करीत हंडे घेऊन काही किलोमीटरची पायपीट करतात, त्याच वेळेला रस्त्यावर मुबलक पाण्याचा सडा टाकण्यात येत आहे.