वॉशिंग्टन : भारताचे सर्वाधिक काळ सलग कार्यरत असलेले निवडून आलेले पंतप्रधान ठरल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अमेरिकेतील सिनेटर, उद्योगक्षेत्रातील नेते आणि अनिवासी भारतीयांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे. टेक्सासचे रिपब्लिकन सिनेटर आणि सिनेट इंडिया कॉकसचे सह-अध्यक्ष जॉन कॉर्निन यांनी ‘एक्स’वरील संदेशात मोदी यांचे अभिनंदन केले. टेनेसीचे रिपब्लिकन सिनेटर बिल हॅगर्टी यांनीही मोदी यांचे अभिनंदन केले; तर अमेरिकन गायिका मेरी मिलबेन यांनी मोदी यांना ‘मित्र’ संबोधून शुभेच्छा दिल्या. सायबर सुरक्षा क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी निकेश अरोरा यांनीही मोदी यांचे अभिनंदन करून १.४ अब्ज नागरिकांच्या विश्वासातून मिळालेल्या नेतृत्वाचा गौरव केला.
भारताचे सर्वाधिक काळ सलग कार्यरत राहिलेले निवडून आलेले पंतप्रधान ठरल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इटली, मालदीव, दक्षिण कोरिया, मलेशिया, भूतान, श्रीलंका, नायजेरिया, केनिया; तसेच ऑस्ट्रेलियासह अनेक देशांच्या नेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाचे आणि सार्वजनिक सेवेमधील योगदानाचे कौतुकही करण्यात आले.
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, मालदीवचे अध्यक्ष महंमद मुइज्जू, मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम, केनियाचे अध्यक्ष विल्यम रुटो, नायजेरियाचे बोला अहमद यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.



