प्रेमाच्या जाळ्यात ओढत महिलांची फसवणूक

महाराष्ट्र टाइम्स

विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळावरून महिलांना फसवणाऱ्या सुरेश रविंद्रला ठाणे पोलिसांनी दिल्ली विमानतळावर अटक केली. आरोपीने एका महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. विवाहानंतर परदेशात नोकरीचे आमिष दाखवून ४८ लाख रुपये आणि महागडी कार उकळली. पैशांची मागणी केल्यास व्हिडीओ प्रसारित करण्याची धमकी दिली. तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई केली.

the story of women looted in the web of love a shocking crime

विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळावरून एका महिलेला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्याशी विवाह केल्यानंतर परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तिची आर्थिक फसवणूक करणाऱ्या सुरेश रविंद्र (वय ३७) याला ठाणे पोलिसांनी दिल्ली विमानतळावरून अटक केली आहे. ठाण्यातील तक्रारदार महिलेसह अन्य चार महिलांची फसवणूक केल्याचे चौकशीत उघड झाले आहे.

मॅट्रिमोनियल संकेतस्थळावरून आरोपीने तक्रारदार महिलेला माहिती पाठवली. त्यानंतर त्याने तिच्याशी मंदिरात विवाह केला. विवाहानंतर तिला परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवत तिच्याकडून महागडी कार आणि ४८ लाख रुपये घेतले. या महिलेने पैशांची मागणी केल्यानंतर त्याने तिच्या मोबाइलमधील शारीरिक संबंधांचे चित्रीकरण केलेले व्हिडीओ प्रसारित करण्याची धमकी दिली होती.

महिलेच्या तक्रारीनंतर ११ मे रोजी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. वरिष्ठ निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर व निरीक्षक विजयकुमार सरनाईक यांच्या पथकाकडून या गुन्ह्याचा तपास सुरू होता.

तांत्रिक माहितीच्या आधारे रविंद्र हा रशियामध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्याच्याविरुद्ध लुकआउट सर्क्युलर (एलओसी) जारी करण्यात आले. रशियावरून नवी दिल्ली विमानतळावर आल्यानंतर इमिग्रेशन विभागाने त्याला ताब्यात घेतले आणि याबाबत ठाणे पोलिसांना माहिती दिली.