नव्या प्राप्तिकर कायद्यातील तरतुदी, आर्थिक वर्ष २०२५-२६चे विवरणपत्र भरताना घ्यावयाची काळजी, तसेच करनियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंडच्या अर्थ विभागातर्फे ‘अर्थप्रबोधन व्याख्यानमाला’अंतर्गत विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’ या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक आहे.
‘२०२५-२६ विवरणपत्र’ या विषयावरील या व्याख्यानात सनदी लेखापाल (सीए) संजीव गोखले मार्गदर्शन करणार आहेत. १ एप्रिलपासून लागू झालेल्या नव्या प्राप्तिकर कायद्याच्या तरतुदी, सर्वसामान्य करदात्यांवर होणारा परिणाम, नव्या करप्रणालीतील बदल, नवीन अर्ज आदींबाबत माहिती यावेळी दिली जाणार आहे. याशिवाय १२ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असतानाही कोणत्या परिस्थितीत कर भरावा लागू शकतो, जुनी करप्रणाली कोणासाठी फायदेशीर ठरू शकते, करबचतीसाठीच्या गुंतवणुकीचे महत्त्व आणि प्रभावी करनियोजन कसे करावे, याबाबतही सविस्तर चर्चा होणार आहे.
हे व्याख्यान शुक्रवार, १२ जून रोजी सायंकाळी ६ वाजता मुलुंड पश्चिम येथील महाराष्ट्र सेवा संघाच्या सुविधा शंकर गोखले स्मृती सभागृहात होणार असून प्रवेश विनामूल्य आहे.

