कल्याण पूर्वेतील आडीवली-ढोकळी परिसरातील तिसाई विद्यालय या चार मजली शाळेच्या इमारतीवर बुधवारी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने धडक कारवाई केली. ही शाळा अनधिकृत असल्याप्रकरणी गेल्या वर्षभरापासून संचालक मंडळाला नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास अवघे चार दिवस शिल्लक असताना थेट शाळेची इमारतच तोडण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.
ही शाळा २०११ पासून या परिसरात चालवली जात आहे. मात्र, या शाळेच्या जागेवरून संचालकांमध्ये अंतर्गत कौटुंबिक वाद सुरू आहे. हीच संधी साधत संचालक बाळाराम गायकवाड यांच्या भावाने ही इमारत अनधिकृत असल्याची तक्रार स्थानिक नगरसेविका सविता विलास भोईर यांच्या माध्यमातून पालिकेकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत पालिका प्रशासनाने कायदेशीर नोटिसांची प्रक्रिया पूर्ण करून बुधवारी सकाळी प्रचंड पोलिस बंदोबस्तात इमारतीवर कारवाई केली.
शाळेच्या इमारतीवर बुलडोझर चालवला जात असल्याचे पाहताच परिसरात शेकडो पालक जमा झाले आणि त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. पालकांनी प्रशासनासमोर खालील मागण्या व प्रश्न उपस्थित केले. संचालकांमध्ये वैयक्तिक आणि कौटुंबिक वाद असतील, तर त्याचा फटका निष्पाप विद्यार्थ्यांना का? आमच्या पाल्यांचे भवितव्य अंधारात का ढकलले जात आहे?, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. आम्हाला किमान एक वर्षाचा वेळ द्यावा. या वर्षात आमच्या मुलांना याच शाळेत शिकू द्यावे, जेणेकरून पुढील वर्षापासून आम्ही दुसऱ्या शाळेत त्यांची व्यवस्था करू शकू. ऐन शाळा सुरू होण्याच्या तोंडावर ही कारवाई करून मुलांचे वर्ष वाया घालवू नका, अशी विनंतीही प्रशासनाला केली आहे.

