डोंंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत जागोजागी भरणाऱ्या आठवडी बाजार ामुळे होणारी वाहतूककोंडी , छेडछाड आणि फेरीवाल्यांकडून रस्त्यावर टाकला जाणारा कचरा यामुळे नागरिक त्रासले आहेत. या आठवडी बाजार आणि फेरीवाल्यांविरोधात बुधवारी डोंबिवलीतील लोढा हेवन परिसरातील रहिवाशांनी इ प्रभाग कार्यालयावर मोर्चा काढत आठवडी बाजार आणि फेरीवाले हटविण्याची मागणी केली.
डोंबिवली पूर्वेतील लोढा हेवन या उच्चभ्रू वसाहतीत प्रत्येक आठवड्याला आठवडी बाजार भरवला जात असून या बाजारात येणाऱ्या फेरीवाल्यांकडून स्थानिक नागरिकांना त्रास दिला जात आहे. यामुळेच या विरोधात स्थानिक नागरिकांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढत प्रशासनाला जाब विचारला. आमदार राजेश मोरे, कल्याण ग्रामीण शहरप्रमुख गजानन पाटील, माजी जि. प. सदस्य प्रकाश म्हात्रे, राजेश कदम यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता.

