इंधनाच्या वाढत्या किमती, वाहन देखभाल खर्च आणि सरकारच्या नवीन नियमांची पूर्तता या पार्श्वभूमीवर बदलापूरमधील स्कूल बसचालकांनी शुल्कवाढीचा निर्णय घेतला आहे. स्कूल बस असोसिएशनच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत बसभाड्यात सुमारे १० टक्के वाढ करण्याचा ठराव मंजूर झाला असून लवकरच त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विविध शालेय साहित्यासह स्कूलबस शुल्कवाढीचीही झळ पालकांना सहन करावी लागणार आहे.
अंबरनाथ, बदलापूर शहरातील पूर्व आणि पश्चिम भागात स्कूल बस असोसिएशनच्या माध्यमातून शंभरहून अधिक बस हजारो विद्यार्थ्यांची शाळेत ने-आण करतात. अंतरानुसार दरमहा ९०० ते १५०० रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाते. स्कूलबस असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मीकांत कोसंदर यांनी सांगितले की, डिझेलचे दर आता प्रतिलिटर ९८ रुपयांपर्यंत पोहोचले असून आगामी काळात ते १०० रुपयांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. याशिवाय वाहनांसाठी लागणाऱ्या टायरच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. पूर्वी सुमारे नऊ हजार रुपयांना मिळणारा टायर आता १२ हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे जुन्या दरात सेवा सुरू ठेवणे कठीण होत असल्याने शुल्कवाढ अपरिहार्य ठरली आहे. याशिवाय शासनाच्या नियमांनुसार स्कूल बसमध्ये जीपीएस यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरे, महिला अटेंडंट, चालक व कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी यांसह विविध २३ अटींची पूर्तता करणे बंधनकारक आहे. या सर्व बाबींमुळे संचालन खर्चात वाढ झाली असून विविध शासकीय शुल्कांमध्येही वाढ झाल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर बससेवा सुरळीत ठेवण्यासाठी शुल्कवाढ आवश्यक असल्याचे सांगत पालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन असोसिएशनने केले आहे.

