पावसाळापूर्व नालेसफाईची कामे ठाण्यातील काही भागात योग्य पद्धतीने न झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. कामांची मुदत उलटूनही नाल्यांमध्ये गाळ जैसे थे' असल्याने मनसे पदाधिकाऱ्यांनी बुधवारी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले.
पावसाळा तोंडावर आला, तरी योग्य पद्धतीने नालेसफाई झाली नसल्याचा आरोप करत मनसेचे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांनी आयुक्त दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. आयुक्तांच्या आदेशाची अधिकारी- कर्मचारी अंमलबजावणी करत नसतील तर त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याबाबत कारवाई करावी. तसेच संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करण्यात यावी, त्यांची नावे काळ्या यादीत समाविष्ट करावीत, त्यांच्या कामांची बिले देण्यात येऊ नयेत किंवा दिली असल्यास त्या रकमेची वसुली संबंधित सहायक आयुक्त व उपायुक्त यांच्या वेतनातून करावी, अशी मागणी मोरे यांनी केली. यावेळी मनसेचे ठाणे जिल्हा सचिव नैनेश पाटणकर, उपशहराध्यक्ष पुष्कर विचारे, सुशांत डोंबे, सौरभ नाईक, सौरभ भोसले, समीक्षा मार्कंडे उपस्थित होते.

