विशाखापट्टणम : विशाखापट्टणम स्टील प्रकल्पातील स्फोटातील मृतांची संख्या नऊ झाली आहे. आठ जून रोजी झालेल्या या भीषण स्फोटात आठ कामगारांचा मृत्यू झाला होता, तर सहा जण जखमी झाले होते. बुधवारी (१० जून) ९० टक्के भाजलेल्या पायदिराजू या कामगाराचा मृत्यू झाला, अशी माहिती कलेक्टर जी. विंध्याधारी यांनी दिली. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला.
२९ दिवसांत शिक्षा
नवी दिल्ली : नैर्ऋत्य दिल्लीतील पालम भागात घराबाहेरील पाण्याच्या दोन मोटारी चोरल्याप्रकरणी द्वारका न्यायालयाने अवघ्या २९ दिवसांत निकाल देऊन प्रिन्स आणि गौतम या दोन आरोपींना दोषी ठरवले आहे. १२ मे रोजी ई-एफआयआर नोंदवल्यानंतर, पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे ३० मे रोजी आरोपींना अटक केली. चार जून रोजी दोषारोपपत्र दाखल झाले आणि सहा दिवसांत खटला पूर्ण झाला.
बॉम्बची धमकी
अहमदाबाद : ‘खलिस्तान नॅशनल आर्मी’च्या नावाने आलेल्या एका धमकीच्या ईमेलमुळे गुजरातमध्ये खळबळ उडाली आहे. यात गांधीनगरमधील मुख्यमंत्री कार्यालय, अहमदाबाद महानगरपालिका, आणि मणिनगरमधील आरएसएस कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी दिली होती. पोलिसांच्या तपासात हा ईमेल ‘व्हीपीएन’द्वारे अमेरिकेतून पाठवल्याचे उघड झाले असून, शोधमोहीम सुरू आहे.
युद्धसज्जतेचा आढावा
उधमपूर : लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी जम्मू-काश्मीरमधील उधमपूर येथील उत्तर कमांडच्या मुख्यालयाला भेट दिली. या वेळी त्यांनी लष्कराची युद्धसज्जता, क्षमता विकास आणि आधुनिकीकरणाचा आढावा घेतला. हायब्रिड पद्धतीने अधिकाऱ्यांशी संवाद साधताना जनरल द्विवेदी यांनी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला आणि जवानांच्या वचनबद्धतेचे व उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले.
नगरसेवकाला अटक
तिरुअनंतपुरम : ‘कापा’ (केएएपीए) कायद्यांतर्गत प्रतिबंधात्मक कोठडीत असलेले भाजप नगरसेवक सुगथन यांना अटक करताना केरळच्या राजधानीत नाट्यमय घडामोडी घडल्या. हायकोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर पोलिस त्यांच्या घरी पोहोचले. तेथे गर्दीने अडथळा आणल्याने पोलिसांनी हवेत गोळीबार केला आणि सुगथन यांना ताब्यात घेतले. या दरम्यान झालेल्या झटापटीत वर्तुळ निरीक्षक विपीन आणि उपनिरीक्षक अभिजित जखमी झाले.
गोळीबारात मृत्यू
जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग शहरात एका झोपडपट्टीत मध्यरात्री झालेल्या अंदाधुंद गोळीबारात १२ जणांचा मृत्यू झाला; तर नऊ जण जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिनीबसधून आलेल्या दहापेक्षा अधिक हल्लेखोरांनी नऊ पुरुष आणि तीन महिलांवर गोळ्या झाडल्या. ११ जणांचा जागीच; तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला.



