तैवानच्या लष्कराने बुधवारी चीनच्या दिशेने ‘शूट-अँड-स्कूट’ मोबाइल प्रक्षेपण यंत्रणेतून रॉकेट्स डागून, संभाव्य चिनी हल्ला परतवून लावण्यासाठी ते कशी तयारी करीत आहे, याचे प्रात्यक्षिक दाखवले.
अमेरिकेकडून पुरवण्यात आलेली ‘हिमार्स’ ही यंत्रणा या पूर्वी चाचणीत वापरण्यात आली होती. मात्र, अरुंद तैवान सामुद्रधुनीतील पाण्यात या यंत्रणेतील रॉकेट्स डागण्याची ही पहिलीच वेळ होती. ‘शत्रूच्या धोक्यामुळे, तैवानचे संरक्षण करण्यासाठी आणि राष्ट्राच्या सर्वांत बळकट शक्तीच्या भूमिकेतून आम्ही अढळ निर्धाराने ‘हिमार्स’चे प्रशिक्षण सुरू ठेवू,’ असे लष्करी सार्जंट वांग मिंग-हुई म्हणाले. लष्कराने सांगितले, ‘या सरावात कमी पल्ल्याची प्रशिक्षण रॉकेट्स वापरण्यात आली. ही रॉकेट्स किनाऱ्यापासून फार दूर न जाता पाण्यात पडतात.’



