नवी दिल्ली, दि. १० (प्रे. ट्र.) - चिन्यांच्या हुकुमाप्रमाणे दलाई लामांची दुष्कीर्ती करण्यापेक्षा आत्महत्या बरी, असे समजून तिबेटी लोक आत्महत्या करीत आहेत.
दलाई लामांच्या धर्मशाळा येथील मुख्य कचेरीतून आलेल्या वृत्तांतात ही माहिती देण्यात आली आहे. हा वृत्तांत दरमहा प्रसृत होत असतो.
तिबेटहून नुकत्याच परत आलेल्या एका व्यक्तींच्या तोंडची हकिकत या वृत्तांतात दिली आहे, ती अशी, की सफाई मोहिमेच्या बुरख्याखाली चिन्यांनी घरोघर जाऊन झडत्या घेतल्या आणि दलाई लामांची चित्रे आणि स्मृतिचिन्हे जप्त करून नेली; तसेच तिबेटमध्ये प्रत्येक खेड्यात कम्युनिस्ट कार्यकारी गटाचा एक सदस्य नेमलेला असून, तो तेथील समाजाच्या हालचालींचा अहवाल देत असतो. वस्तुत: हा गट म्हणजे राजकीय हेरगिरीचा गटच आहे.
(११ जून १९६६)



