‘ नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया’ हा त्रिपुरातील प्रादेशिक पक्ष असून, त्याची फारशी माहिती नाही. नोंदणीकृत असलेल्या या पक्षाला निवडणूक आयोगाने मान्यताही दिलेली नाही. बंगाली भाषकांचे प्रतिनिधित्व हा पक्ष करतो. सन २०२३मध्ये झालेली विधानसभा निवडणूक या पक्षाने लढविली होती.
तृणमूल काँग्रेसच्या २० खासदारांनी रविवारी त्रिपुरातील ‘नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी’ या पक्षात विलीनीकरण करण्याची घोषणा केली. रविवारी सायंकाळी तातडीने या खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन त्यांना पत्र दिले आणि या विलीनीकरणाला मान्यता देऊन सभागृहात बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्याची विनंती केली. तत्पूर्वी, तृणमूल काँग्रेसचे नेते, खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी बिर्ला यांना पत्र पाठवून पक्षाची भूमिका ऐकल्याशिवाय निर्णय देऊ नये, अशी विनंती केली होती.
‘तृणमूल’मधील बंडखोर खासदारांनी काकोली घोष दस्तीदार यांच्या नेतृत्वाखाली ओम बिर्ला यांची सोमवारी भेट मागितली होती. तशी वेळही निश्चित करण्यात आली होती. मात्र, रविवारी दुपारीच चक्रे वेगाने फिरली. काकोली घोष दस्तीदार, सुदीप बंदोपाध्याय यांनी दुपारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेतली. त्याच वेळी अभिषेक बॅनर्जी यांनी बिर्ला यांना पत्र पाठवले आणि कोणत्याही गटाला आमचे म्हणणे ऐकल्याशिवाय मान्यता देऊ नये, अशी विनंती केली. पक्षाचे खासदार कीर्ती आझाद आणि सागरिका घोष यांनी हे पत्र घेऊन बिर्ला यांची भेट घेतली. कोणत्याही गटाला मान्यता देऊ नये, अशी मान्यता घटनेनुसार देता येणार नाही, असे त्यांनी बिर्ला यांना कळवले. या पत्रावर १० जून अशी तारीख आहे. त्या दिवशी मेलद्वारे हे पत्र बिर्ला यांना पाठविण्यात आले.
बिर्ला यांच्याशी चर्चा
भूपेंद्र यादव यांच्याशी चर्चा झाल्यानंतर लगेचच बंडखोर खासदारांनी बिर्ला यांचे निवासस्थान गाठले. बिर्ला यांच्याशी सुमारे तासभर चर्चा झाली. ‘पक्षाच्या २० खासदारांनी अध्यक्ष बिर्ला यांची भेट घेतली आणि सभागृहात स्वतंत्र बसण्याची व्यवस्था करण्याची विनंती केली. पक्षाच्या निवडून आलेल्या खासदारांपैकी दोन तृतीयांशी संख्याबळ आमच्याकडे आहे. आम्ही आमचा गट नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टीत विलीन करीत आहोत. देशासाठी आम्ही काम करीत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीबरोबर जात आहोत,’ असे काकोली घोष दस्तीदार यांनी बिर्ला यांच्या भेटीनंतर पत्रकारांना सांगितले.
तृणमूल काँग्रेसच्या नाव व चिन्हासाठी कायदेशीर मार्ग अवलंबणार असल्याचे सुदीप बंदोपाध्याय यांनी सूचित केले. ‘पक्षाचे दोन तृतीयांश खासदार पक्ष सोडतात, त्या वेळी तुम्ही पहिल्याच दिवशी पक्षाच्या नावावर दावा करू शकत नाही. जुलै महिन्यांत आम्ही तृणमूल काँग्रेसवर दावा करणार आहोत. त्याचा निर्णय न्यायालय देईल,’ असे बंदोपाध्याय म्हणाले.
अपात्रतेची मागणी
राज्यसभेतील खासदार कपिल सिब्बल यांनी तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांच्या अपात्रतेची मागणी केली. ‘ते एखाद्या राजकीय पक्षात विलीन होऊ शकत नाहीत आणि तसे तेव्हाच होऊ शकते जेव्हा तृणमूल काँग्रेसची तशी इच्छा असेल,’ असे ते म्हणाले. भारतीय लोकशाही ही ‘थिएटर ऑफ द ॲब्सर्ड’ बनली आहे, असेही सिब्बल म्हणाले.




