‘राज्यात आतापर्यंत ४८ ठिकाणी साहित्य संमेलने झाली आहेत. या ठिकाणांसह विविध भागांमध्ये ‘नांदी शंभराव्या साहित्य संमेलानाची’ हे छोटेखानी संमेलन भरविण्यात येणार आहे. १५ ऑगस्ट २०२६ ते १५ जानेवारी २०२७ या कालावधीत हे संमेलन होणार असून, विविध साहित्यिक उपक्रम आणि ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहेत,’ अशी माहिती योगेश सोमण यांनी दिली.
‘अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २८ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित केले जाणार आहे,’ असे महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी रविवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. पुणे शहरातील हे बारावे आणि जिल्ह्यातील पंधरावे साहित्य संमेलन असेल.
‘शंभराव्या संमेलनासाठी महामंडळाच्या स्थळ निवड समितीने शनिवारी स. प. महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या तीन ठिकाणांची पाहणी केली. विस्तीर्ण परिसर, अत्याधुनिक सुविधा, विविध कार्यक्रमांसाठी स्वतंत्र सभागृहे, निवास व वाहनतळाची व्यवस्था यादृष्टीने; तसेच शंभराव्या संमेलनासाठी होणारी गर्दी पाहता शहरातील सार्वजनिक व्यवस्थेवर ताण पडू नये, हा विचार करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची एकमताने निवड करण्यात आली. महामंडळाची घटक संस्था महाराष्ट्र साहित्य परिषद संमेलन आयोजित करणार असून समर्थ युवा फाउंडेशन संयोजन करणार आहे,’ असे सोमण यांनी सांगितले. महामंडळाच्या प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर आणि समर्थ युवा फाउंडेशनचे मुख्य संयोजक राजेश पांडे उपस्थित होते.
‘२८ जानेवारी रोजी सायंकाळी संमेलनाचे उद्घाटन होणार असून, पुढील तीन दिवस भरगच्च साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. शंभराव्या संमेलनात विशेष कार्यक्रम आणि भव्य ग्रंथप्रदर्शन असेल. विद्यापीठातील मैदानावर आणि विविध सभागृहांमध्ये कार्यक्रम होतील. प्रतिनिधींची मुक्कामाची सोय विद्यापीठात केली जाणार आहे,’ असे सोमण यांनी सांगितले.
संबंधित वृत्त...७




