विहिरीत वाहन पडून आठ ठार

महाराष्ट्र टाइम्स

सोलापूर जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला. माळशिरस तालुक्यात पिकअप वाहन विहिरीत कोसळले. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला. सहा जण जखमी झाले आहेत. रांझणी गावातील १५ भाविक दर्शनाहून परतत असताना हा अपघात घडला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन खोल विहिरीत पडले. मृतांच्या वारसांना शासनाकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.

विहिरीत वाहन पडून आठ ठार
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात रविवारी पिकअप वाहन विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात सहा जण जखमी झाले. म्हसवड-पंढरपूर मार्गावरील तांदूळवाडी गावाजवळ सुतार टेकडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत हे वाहन कोसळले.

अपघातग्रस्त वाहन विहिरीमधून बाहेर काढण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. या घटनेमुळे पंढरपूर तालुक्यातील रांझणी गावावर शोककळा पसरली. अपघातग्रस्त याच गावातील आहेत. मृतांमध्ये इंदुबाई दशरथ बावचे (वय ६०), पूजा अमोल सातोरे (वय २३), पूजा बालाजी बावचे (वय २७), अश्विनी संदीप बावचे (वय २७), संस्कार संदीप बावचे (वय १४), संस्कृती संदीप बावचे (वय १४), आरव अमोल सातोरे (वय ८) आणि समर्थ बालाजी बावचे (वय ६ महिने) यांचा समावेश आहे. वाहनचालक सागर चौगुलेदेखील अपघातात जखमी झाला आहे.

सागर सावकार चौगुले (वय २५), संदीप दशरथ बावचे (वय ३६), बालाजी दशरथ बावचे (वय ३२), जिया बालाजी बावचे (वय दोन), शशिकला पोपट जाधव (वय ५०) अशी या अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.

पंढरपूर तालुक्यातील रांझणी येथील १५ भाविक पिकअप वाहनातून सिद्धनाथ महाराजांच्या दर्शनासाठी म्हसवडला गेले होते. दर्शन आटोपून सर्व जण वाहनातून रांजणी गावाकडे परतत असताना, तांदूळवाडी परिसरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.

रस्त्याच्या कडेला शेतात मोठ्या व्यासाच्या व पाण्याने भरलेल्या खोल विहिरीत हे वाहन कोसळले. विहिरीला कठडे नसल्याने आणि चालकाच्या चुकीमुळे हा भीषण अपघात घडला असल्याचा आरोप मृतांच्या नातेवाइकांनी केला. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या प्रकरणी कडक कारवाई करण्याचा आदेश दिला.

मृतांच्या वारसांना मदत

माळशिरस तालुक्यात झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला. अपघाताची घटना अतिशय दुर्दैवी असल्याचे त्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे. या घटनेतील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले.