रिया घारेला व्हायचेय जिल्हाधिकारी

Contributed byबंडू येवले|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

लोणावळ्याच्या धनगव्हान गावातील रिया घारे हिने प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढला. चार किलोमीटर रोज चालत शाळेत जाऊन तिने दहावीत ९०.६० टक्के गुण मिळवले. शिकवणीशिवाय हे यश मिळवत तिने शाळेत पहिला क्रमांक पटकावला. तिला जिल्हाधिकारी व्हायचे असून त्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. रियाची ही जिद्द अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

रिया घारेला व्हायचेय जिल्हाधिकारी

लोणावळा : मावळ तालुक्यातील धनगव्हान या दुर्गम भागातील गावापासून जवळच असलेल्या शिवली परिसरातील शाळेचा रस्ता चार किलोमीटरचा... शाळा सुरू झाली, तेव्हापासूनच जोराचा पाऊस सप्टेंबरपर्यंत कायम राहिला होता... पाण्याच्या प्रवाहाला न जुमानता आणि शेतातील निसरड्या बांधांवरून पायी चालत जाऊन, रिया घारे हिने खडतर प्रवास केला आणि दहावीच्या परीक्षेत ९०.६० टक्के गुण मिळवले.

दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा मार्ग दाखविणाऱ्या या प्रवासातून भविष्यात अनेक विद्यार्थी घडावेत, अशी तिची इच्छा असल्यानेच तिला जिल्हाधिकारी व्हायचे आहे. त्यासाठी पुढील शिक्षणासाठी तिला आर्थिक पाठबळाची गरज आहे.

धनगव्हान या गावातील शेतकरी कुटुंबात रियाचा जन्म झाला. तिचे वडील सध्या कल्याणमध्ये हॉटेलात वेटर म्हणून काम करतात. रियाची आई गृहिणी आहे. वडील कामानिमित्त कल्याणला असल्याने रियाची जबाबदारी चुलते छबुराव घारे यांच्याकडे आहे. रियाला तिच्या गावापासून शाळेत जाण्यासाठी रोज चार किलोमीटर पायी जावे लागते. म्हणजे दिवसभरात आठ किलोमीटरची पायपीट झाली. या खडतर परिस्थितीत तिने दहावीच्या परीक्षेत यश मिळवले. श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयात ती पहिली आली. कोणतीही शिकवणी न लावता केवळ तिने हे यश मिळवले.

शाळेतून घरी आल्यानंतर आईला घरकामात मदत करण्यात रिया पुढे होती. संध्याकाळी दररोज तीन तास अभ्यास आणि पुन्हा पहाटे पाच वाजता उठून दीड ते दोन तासांचा अभ्यास हे सातत्य तिने वर्षभर ठेवले.

 उर्वरित मजकूर...२