अमरावती : बडनेरा येथे ओम आशिष कैथवास नामक २३ वर्षीय युवकाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी गुन्हे शाखेने गतीने तिन्ही आरोपींना अवघ्या काही तासांत बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींमध्ये रोशन धनराज कैथवास (वय १९, रा. बडनेरा), संकेत विनोद कैथवास (वय २०, रा. बडनेरा) आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. ओम दुचाकीने घरी जात असताना आरोपींनी भगतसिंग चौकात त्याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. तो खाली पडल्यानंतर त्याच्यावर चाकूने सपासप वार केले.
विहिरीवर काम
करताना मृत्यू
सातारा : खटाव तालुक्यातील मौजे जाखणगाव येथे विहिरीवर काम करत असताना अचानक चक्कर येऊन दगडावर पडल्याने एका २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उमेश धर्मेंद्र चव्हाण (रा. आंधळी, ता. माण) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पुसेगाव पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. उमेश काम करत असताना त्याला अचानक चक्कर आली आणि तो खाली असलेल्या दगडांवर कोसळला. या अपघातामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. ९ जून रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
६६५ कोटींचे ड्रग्ज
मुंबईमध्ये नष्ट
मुंबई : मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने जप्त करण्यात आलेले सुमारे एक हजार २०० किलोंहून अधिक वजनाचे ड्रग्ज आणि कफ सीरपच्या साडेपाच हजार बाटल्या नष्ट केल्या. या मुद्देमालाची किंमत सुमारे ६६५ कोटी होती. अमली पदार्थविरोधी पथक ड्रग्जतस्कर, विक्रेते; तसेच सेवन करणारे यांच्यावर कारवाई करून त्यांच्याकडून अमली पदार्थ जप्त करते. न्यायालयाच्या परवानगीने हे ड्रग्ज नष्ट केले जातात. यानुसार अमली पदार्थविरोधी पथकाला ६६५ कोटी रुपयांचे ड्रग्ज नष्ट करण्याची परवानगी मिळाली होती. याअंतर्गत पनवेल येथील कंपनीच्या बंदिस्त भट्टीमध्ये ते जाळून नष्ट करण्यात आले.
‘माहीम’ला
नवी झळाळी
मुंबई : अरबी समुद्राच्या साक्षीने शतकानुशतके उभा असलेला माहीम किल्ला आता नव्या रूपात मुंबईकरांसमोर येणार आहे. अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेल्या या ऐतिहासिक वास्तूला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी बृहन्मुंबई महापालिका आणि सीमाशुल्क विभागाने गुरुवारी करार केला. तब्बल २० कोटी रुपयांच्या खर्चातून किल्ल्याचे संवर्धन, पुनरुज्जीवन आणि पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याचा मार्ग या करारामुळे मोकळा झाला आहे.
मोबाइलप्रेमी पत्नीने
पतीला बदडले
यवतमाळ : बऱ्याच वेळापासून पत्नी कुणाशी तरी बोलत असल्याचे पाहताच पतीने मोबाइल बंद करण्यास सांगितले. यावरून संतापलेल्या पत्नीने मोबाइल बंद करून पतीच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून काठीने बेदम मारहाण केली. महागाव तालुक्यातील सवाना येथे शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. संतोष शंकर धोत्रे (वय ३२) यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून त्यांची पत्नी राधिका धोत्रे हिच्याविरोधात विविध कलमांखाली गुन्हे नोंदविले आहेत.










