नीरा देवघर धरणामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा रविवारी (२१ जून) बुडून मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला. ही घटना सकाळी सहा ते साडेसहा दरम्यान धरणाच्या बॅक वॉटरमध्ये घडली. देवेश मिश्रा (वय २२, रा. पुणे-सोलापूर टोलनाका, फुरसुंगी) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी भोर पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे चार मित्र शनिवारी रात्री नीरा देवघर परिसरातील वेणूपुरी येथे मुक्कामी आले होते. पहाटे धरणाच्या परिसरात पोहण्यासाठी गेले. सर्वजण पाण्यात उतरले. दरम्यान, एका ठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्यामुळे देवेश मिश्रा पाण्यात बुडाला. दरम्यान, त्याच्या मित्राने देवघर परिसरातील वेणूपुरी येथे छोटासा अपघात झाल्याचे रविवारी सकाळी देवेशच्या आईला कळवले. दुर्घटनेची माहिती मिळताच भोईराज आपत्ती व्यवस्थापनाचे जवान व पोलिस घटनास्थळी पोहचले.
शोधकार्य सुरू केल्यानंतर रविवारी दुपारी एकच्या सुमारास देवेश याचा मृतदेह हाती लागला. येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.









