खडकवासला पुलाच्या दुरुस्तीची कामे पूर्ण

Contributed byप्रकल्प विभागप्रमुख|महाराष्ट्र टाइम्स
खडकवासला पुलाच्या दुरुस्तीची कामे पूर्ण
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

खडकवासला धरणाच्या खाली मुठा नदीवर १९६५ साली बांधण्यात आलेल्या आणि खडकवासला-शिवणे परिसराला जोडणाऱ्या महत्त्वाच्या पुलाची दुरुस्ती व बळकटीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे पुलाचे आयुर्मान वाढले असून, आणखी दहा ते पंधरा वर्षे हा पूल वापरणे शक्य होईल. महापालिकेतर्फे लवकरच हा पूल जड वाहतुकीसाठीही खुला करण्यात येणार आहे.

खडकवासला गाव महापालिकेत आल्यानंतर या पुलाची जबाबदारी महापालिकेकडे आली. १६० मीटर लांबीचा आणि साडेसहा मीटर रुंदीचा हा पूल खडकवासला आणि शिवणे परिसरातील नागरिकांसाठी प्रमुख दळणवळणाचा मार्ग आहे. पुणे महापालिकेत समावेश झाल्यानंतर प्रकल्प विभागामार्फत पुलाचे रचनात्मक परीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्यात आले. या तपासणीत पुलाची अवस्था चिंताजनक असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तज्ज्ञ सल्लागारांकडून सविस्तर ऑडिट करण्यात आले. त्यात पुलातील काँक्रिटची क्षमता (स्ट्रेंग्थ) ‘एम-१५’ ते ‘एम-१७’ इतकी खालावल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला.

कामाच्या कालावधीत वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने पुलावर जड वाहनांना बंदी घालण्यात आली होती. महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प विभागप्रमुख दिनकर गोजारे यांच्या नेतृत्वाखाली हे काम करण्यात आले.

पुलाचे बळकटीकरण करताना विविध तांत्रिक उपाययोजना करण्यात आल्या. धरणातून मोठ्या वेगाने सोडल्या जाणाऱ्या पाण्याचा थेट परिणाम पुलाच्या खांबांवर होत असल्याने पिलर्सचे जॅकेटिंग करण्यात आले. पुलाचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त झाल्यामुळे मूळ काँक्रिटचे डिग्रेडेशन (झीज) झाली होती. त्यामुळे जुने खराब झालेले सर्व काँक्रिट काढून, त्याऐवजी अत्याधुनिक ‘पॉलिमर मॉर्टर’चा वापर करून नवीन काँक्रिट भरण्यात आले. पुलाच्या स्लॅब व पिलर्सची ताकद वाढवण्यासाठीही ‘इपॉक्सी ग्राउटिंग’ची प्रक्रिया करण्यात आली.

दोन्ही बाजूस पुलाची सांधेभरणी करून त्यांचे आयुर्मान वाढविण्यात आले. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुलाच्या दोन्ही बाजूंना सुरक्षा जाळी बसविण्यात आली आहे. पावसाचे पाणी योग्य प्रकारे वाहून जावे यासाठी पुलाचे पुनर्डांबरीकरण करण्यात आले आहे. रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक दिशादर्शक फलक आणि इतर ‘रोड फर्निचर’ची कामेही पूर्ण झाली आहेत; तसेच खडकवासलाकडील बाजूस ‘मेटल क्रॅश बॅरियर’ उभारण्यात आले आहेत.