राज्य कोचिंग क्लास संघटनांच्या महासंघाचे प्रवक्ते आणि उपाध्यक्ष बंडोपंत भुयार यांनी कोचिंग क्लास आणि महाविद्यालयांमधील वाढत्या संलग्नतेकडेही लक्ष वेधले. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयातील नियमित अध्यापनापेक्षा कोचिंग क्लासला अधिक महत्त्व दिले जाते. काही ठिकाणी कनिष्ठ महाविद्यालये आणि क्लास यांच्यातील अनौपचारिक करारांमुळे शिक्षण व्यवस्थेत विकृती निर्माण होत आहे. या बाबींवरही स्पष्ट नियम असणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
मुंबई : राज्यातील कोचिंग क्लासच्या नियमनासाठी गेली दोन दशके चर्चेत असलेल्या स्वतंत्र कायद्याला अखेर यंदाच्या पावसाळी अधिवेशनात मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. आज, सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात कोचिंग क्लास नियमन विधेयक सादर करण्यात येणार असल्याचे संकेत शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिले. व
िद्यार्थ्यांची किमान संख्या, सुरक्षेचे निकष, शुल्क आकारणी, पायाभूत सुविधा; तसेच क्लासच्या वेळांबाबत स्पष्ट नियमावली या विधेयकात असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्पर्धा परीक्षा, दहावी-बारावी, अभियांत्रिकी, वैद्यकीय प्रवेश परीक्षा आदींसाठी राज्यभर कोचिंग क्लासचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. मात्र, या क्षेत्रावर नियंत्रण ठेवणारी कोणतीही स्वतंत्र कायदेशीर चौकट नसल्याने विद्यार्थी आणि पालकांच्या तक्रारी वाढत होत्या. अलीकडेच ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात काही कोचिंग संस्थांची नावे समोर आल्यानंतर या विषयाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. कोचिंग क्लाससाठी स्वतंत्र नियामक व्यवस्था उभी करण्याच्या दृष्टीने विधेयक तयार करण्यात आले आहे. कोचिंग क्लासद्वारे केल्या जाणाऱ्या फसव्या जाहिरातींना चाप लावण्याकडेही लक्ष दिले जाणार आहे. अनेक मोठ्या कोचिंग क्लासच्या वेळा महाविद्यालयीन वेळांशी संलग्न असतात. या बाबीकडेही या विधेयकात लक्ष दिले जाणार आहे.
राज्य कोचिंग क्लास संघटनांच्या महासंघाने विधेयकाचे स्वागत केले असले, तरी अंतिम मसुदा तयार करताना सर्व संबंधित घटकांशी सल्लामसलत झाली का, याबाबत प्रश्न उपस्थित केले. ‘आम्ही कोचिंग क्लाससाठी कायद्याची मागणी करत आहोत. मात्र, कायद्यातील तरतुदी व्यवहार्य असणे आवश्यक आहे. जुन्या मसुद्यानुसार पाच विद्यार्थ्यांपासून क्लासची नोंदणी अनिवार्य करण्यात आली होती. अनेक महिला आपल्या परिसरात लहान स्वरूपाचे क्लास चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्यासाठी सर्व नियमांची पूर्तता करणे कठीण जाईल,’ असे राज्य कोचिंग क्लास संघटनांच्या शिखर संघटनेचे सचिव दिलीप मेहंदळे यांनी सांगितले.










