प्रत्येकाने योग करणे गरजेचे

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
international yoga day it is essential for everyone to practice yoga

लातूर : ‘भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा असलेला योग आज जागतिक पातळीवर स्वीकारला गेला असून, निरोगी आरोग्यासाठी प्रत्येकाने दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार करावा,’ असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी आज केले.

जागतिक योग दिनानिमित्त लातूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे विशेष योगाभ्यास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला लातूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्हा प्रशासन, लातूर शहर महापालिका, पतंजली योग समिती आणि प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्था यांच्यातर्फे हा कार्यक्रम आयोजिण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. महापौर जयश्री सोनकांबळे, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांची प्रमुख उपस्थिती होती. योग शिक्षक विष्णू भुतडा यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी विविध योगासने आणि प्राणायाम केला. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने निश्चित केलेल्या योग शिष्टाचारानुसार प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. या कार्यक्रमास जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. सुधीर बनशेळकीकर, श्रुष्टी जगताप तसेच पतंजली योग समिती आणि प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, मारवाडी राजस्थान माध्यमिक विद्यालय, बंकटलाल लाहोटी इंग्लिश स्कूल, राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूल, देशिकेंद्र माध्यमिक विद्यालय आणि राजमाता जिजामाता माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.