कोल्हापुरात मिळणार नवीन उद्योगांना बळ

महाराष्ट्र टाइम्स
new meaning to industrial development in kolhapur

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने मौजे टाकळी येथील एकूण ४७.६३ हेक्टर शासकीय व गायरान जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) औद्योगिक प्रयोजनासाठी प्रदान करण्यास मंजुरी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रस्तावाला रविवारी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

या निर्णयानुसार, टाकळी (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) येथील गट क्रमांक १३५० मधील १२.८६ हेक्टर गायरान जमीन, १५ हेक्टर शासकीय जमीन; तसेच गट क्रमांक ११९४ मधील १९.७७ हेक्टर गायरान जमीन अशी एकूण ४७.६३ हेक्टर जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला देण्यात येणार आहे. जमीन औद्योगिक प्रकल्प उभारण्यासाठी वापरण्यात येणार असून, जमिनीच्या बाजारमूल्यानुसार संपूर्ण रक्कम ‘एमआयडीसी’कडून वसूल करण्यात येणार आहे.