रुग्णांना दर्जेदार, तत्काळ आणि परिणामकारक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयात लवकरच पेट स्कॅन मशिनची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच एमआरआय मशीन जलदगतीने कार्यान्वित करण्याचे निर्देश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपीन शर्मा यांनी दिले.
केईएम रुग्णालयाला यंदा शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर कॅन्सर उपचार सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी रुग्णालयातील पेट स्कॅन यंत्रणेचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. तसेच वैद्यकीय औषधोपचार सुविधा बळकट करण्यासाठी लगतच्या टाटा कॅन्सर रुग्णालयासोबत समन्वय साधून सर्वंकष आढावा घेण्यात येणार असून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे.
डॉ. शर्मा यांनी गुरुवारी केईएम रुग्णालयातील विविध सोयीसुविधांचा आढावा घेतला. यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपायुक्त शरद उघडे, वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. शैलेश मोहिते, प्रभारी अधिष्ठाता डॉ. अमिता आठवले आणि कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा उपस्थित होत्या. बैठकीत रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणालीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. रुग्णांना अधिक जलद, अचूक व पारदर्शक सेवा देण्यासाठी ‘एचएमआयएस’चा प्रभावी वापर आवश्यक असल्याचे डॉ. शर्मा यांनी नमूद केले.










