सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील प्रत्येक पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले ‘ सायबर स्कॉड ’ अधिक सक्षम करण्यात येणार आहे.
तक्रारींची तत्काळ दखल, फसवणुकीतील रक्कम गोठविणे, ‘एनसीआरपी’ आणि १९३० या हेल्पलाइनवरील प्रकरणांचा पाठपुरावा; तसेच प्राथमिक तपासाची जबाबदारी या स्कॉडकडे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस ठाणे स्तरावरच यंत्रणा उभी राहणार आहे.
ऑनलाइन फसवणूक, डिजिटल अटक, बनावट गुंतवणूक योजना, सोशल मीडियावरील आर्थिक फसवणूक आणि बँकिंग व्यवहारांशी संबंधित गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. अशा गुन्ह्यांमध्ये पहिल्या काही तासांतील कारवाई महत्त्वाची ठरत असल्याने ‘सायबर स्कॉड’च्या कामकाजासाठी स्वतंत्र कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.
प्रत्येक पोलिस ठाण्यात एक अधिकारी आणि तीन अंमलदारांचे सायबर पथक कार्यरत राहणार आहे. हे पथक सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत सायबर तक्रारींचे परीक्षण करणार असून, फसवणुकीतील रक्कम वळवलेली खाती गोठविण्यासाठी ‘जीआरएम पोर्टल’चा वापर करणार आहे. पाच लाखांपेक्षा अधिक रकमेच्या फसवणुकीच्या प्रकरणांत गुन्हा दाखल करून तपासाला गती दिली जाणार आहे. ‘सायबर स्कॉड’मधील कर्मचाऱ्यांना इतर कामे न देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांचे संपूर्ण लक्ष सायबर गुन्ह्यांच्या तपासावर केंद्रित राहणार आहे.










