पिंपरी : आळंदी येथील एका मंगल कार्यालयामध्ये बालविवाह लावला जात असल्याचे अज्ञाताने पोलिस महासंचालक कार्यालयातील हेल्पलाइनवर सांगितले. त्यानंतर आळंदी पोलिसांनी मंगल कार्यालयात धाव घेतली आणि १४ वर्षीय मुलीचा विवाह रोखण्यात यश आले.
संत सेना महाराज मंगल कार्यालयामध्ये शुक्रवारी हा प्रकार घडला. या प्रकरणी बालविवाह प्रतिबंधक अधिनियमानुसार अंगणवाडी सेविकेने संबंधित कुटुंबीयांच्या विरोधामध्ये फिर्यादी दिली असून, आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुन्नर तालुक्यातील १४ वर्षे दहा महिने वयाच्या मुलीचा नात्यातीलच वाघोली येथील २६ वर्षीय मुलाशी विवाह लावून दिला जात होता. आळंदी पोलिसांनी माहिती मिळाल्यानंतर पथकाला पाठवून संबंधितांना पोलिस ठाण्यात आणण्यात आले. अधिकाऱ्यांनी दोन्ही कुटुंबीयांचे समुपदेशन केले.










