महाबळेश्वर -पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात शनिवारी रात्री मेटतळे धबधब्यानजीक लघुशंकेसाठी थांबलेला एक पर्यटक तोल जाऊन सुमारे ३०० फूट खोल दरीत कोसळला. दैव बलवत्तर म्हणून आणि महाबळेश्वर ट्रेकर्ससह प्रतापगड रेस्क्यू टीमच्या समयसूचकतेमुळे या पर्यटकाचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.
शनिवारी रात्री पावणेअकरा वाजता ही घटना घडली. पाऊस, दाट धुके आणि अंधारातही रेस्क्यू टीमच्या जवानांनी घटनास्थळ गाठले. पोलिस कर्मचारी दाखल झाल्यानंतर जवानांनी दोरी आणि स्ट्रेचरच्या साह्याने शोधमोहीम सुरू केली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जवान जीव धोक्यात घालून दरीत उतरले. काही वेळातच त्यांना पर्यटक जखमी अवस्थेत आढळला. त्याला मोठ्या प्रयत्नांनी स्ट्रेचरवरून वर आणण्यात आले.
या मोहिमेत ‘प्रतापगड रेस्क्यू टीम’चे अनिकेत वागदरे, अजित जाधव, ‘महाबळेश्वर ट्रेकर्स’चे सोमनाथ वागदरे, सुजित कोळी आणि महाबळेश्वर पोलिस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.










