सातारा : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सातारा येथील डी-मार्टसमोर रविवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. कोल्हापूरहून जेजुरीच्या दिशेने जाणाऱ्या मिनी बसने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाला; तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व प्रवासी कोल्हापूर जिल्ह्यातील कसाब गावचे रहिवासी आहेत. देवदर्शनासाठी ते जेजुरीकडे निघाले होते. सातारा परिसरातील डी-मार्टजवळ आले असता, त्यांच्या भरधाव मिनी बसने पुढे जात असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात पहाटे पावणेपाच वाजता झाला. या दुर्घटनेत स्नेहल उत्तम कांबळे आणि एकनाथ बापू कांबळे या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
ही धडक इतकी भीषण होती, की मिनी बसच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ‘शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीम’चे कार्यकर्ते रोहित बनसोडे, बबलू पवार, अनिकेत भांडे, ऋषी रंकाळे आणि अजय शिंगे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने गाडीत अडकलेल्या जखमींना आणि मृतांना बाहेर काढले.
जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
वाहतूक विस्कळित
महामार्गावरील या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली. या घटनेमुळे कसाब गावावर शोककळा पसरली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.










