सोलापूर, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, नागपूर (पोटनिवडणूक), भंडारा-गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजीनगर - जालना
विधान परिषदेच्या ११ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांसाठी झालेल्या निवडणुकीची आज, सोमवारी राज्यात मतमोजणी होणार आहे. राज्यातील एकूण १७ जागांवर निवडणुका घोषित करण्यात आल्या होत्या; परंतु, त्यातील सहा जागा बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी करण्यात आली होती. मात्र, महायुतीचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे. मतफुटी होऊन महाविकास आघाडीतील पक्षांना खिंडार पडले आहे का, हेही पाहावे लागणार आहे.
विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी होत असलेली ही निवडणूक गाजली ती महाविकास आघाडीतील उमेदवारांनी ऐनवेळी घेतलेल्या माघारीमुळे. या माघारीमुळे सहा जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. उर्वरित जागांवरही महायुतीच्याच उमेदवारांचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे. व्हिपविरोधात जाऊन कुणी मतदान केल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर कुणाची सरशी होते हे पाहावे लागणार आहे.










