विधानसभा अध्यक्षांकडून दिलगिरी व्यक्त

Contributed byमुंबई|महाराष्ट्र टाइम्स
विधानसभा अध्यक्षांकडून दिलगिरी व्यक्त
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
ज्येष्ठ दिवंगत गायिका आणि पद्मविभूषण आशा भोसले यांच्यासंदर्भातील शोकप्रस्तावाचे वाचन करताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी सभागृहात दिलगिरी व्यक्त केली.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आशा भोसले यांच्यासंदर्भातील शोकप्रस्ताव सादर करण्यात आला होता. या शोकप्रस्तावाचे वाचन करताना नार्वेकर यांच्याकडून असंख्या चुका झाल्या. त्यामुळे समाज माध्यमांवर नार्वेकर यांच्यावर टीकेची झोड उठली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही नार्वेकर यांच्यावर बोचरी टीका केली. या सर्व पार्श्वभूमीवर नार्वेकर यांनी सभागृहात खुलासा केला. ते म्हणाले की, ‘त्या दिवशी सभागृहात एकूण १२ शोकप्रस्तावांचे वाचन करायचे होते. माझ्या हातात आलेली प्रत अत्यंत बारीक आणि अस्पष्ट फॉन्टमध्ये होती. त्यात काही तांत्रिक त्रुटीही होत्या, ज्या सुरुवातीला लक्षात आल्या नव्हत्या. त्यामुळे वाचन करताना जशा चुका मजकुरात होत्या, त्याचप्रमाणे त्या माझ्याकडून वाचल्या गेल्या. यातून कोणीही वेगळा अर्थ काढू नये’.