‘मविआ’च्या बैठकीत केवळ ३६ आमदार

Contributed byमुंबई|महाराष्ट्र टाइम्स
only 36 mlas attend mahavikas aghadi meeting
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच बुधवारी महाविकास आघाडीने आमदारांची विशेष बैठक मुंबईत बोलावली होती. या बैठकीला तिन्ही पक्षांच्या एकूण ६० आमदारांपैकी केवळ ३६ आमदार उपस्थित राहिल्याने राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. आघाडीतील समन्वय आणि संघटनात्मक ताकदीबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे कळते.

मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह संजय राऊत, शशिकांत शिंदे आणि सतेज पाटील उपस्थित होते. पावसाळी अधिवेशनाच्या पाश्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. विधिमंडळात जनतेचे प्रश्न आक्रमकपणे मांडणे, सभागृहात आणि सभागृहाबाहेर संयुक्त भूमिका घेणे, तसेच सर्व घटक पक्षांमध्ये अधिक समन्वय राखण्यावर भर देण्यात आला. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचाही आढावा घेण्यात आला. अलीकडील पक्षांतरांच्या पार्श्वभूमीवर ‘जे गेले त्यांचा विचार करू नका, पुढील लढाईवर लक्ष केंद्रित करा’, असा संदेशही नेतृत्वाने दिल्याचे समजते.