इंग्लंडने आपले आक्रमण अधिक प्रभावी करण्यासाठी जर्मनीतील थॉमस टशेल यांच्याकडे जबाबदारी सोपवली; मात्र इंग्लंडला पुन्हा एकदा मुख्य स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यातील बरोबरीचा फेरा चुकवता आला नाही. घानाने भक्कम बचाव करीत इंग्लंडला वर्ल्ड़ कप फुटबॉलच्या गटसाखळी सामन्यात गोलशून्य बरोबरीत रोखले.
पूर्वार्धात चेंडूवर ८० टक्के वर्चस्व राखल्यावर इंग्लंडला गोलचा एकही प्रयत्न करता आला नाही. पहिल्या प्रभावी किकसाठी ५७ मिनिटे प्रतीक्षा करावी लागली. घानाने हॅरी केन; तसेच गोलक्षेत्राच्या नजिक येणाऱ्या आक्रमकांभोवती जणू बचावपटूंचे कडे केले. पराभवास सामोरे जावे लागले नाही, हे इंग्लंडचे सुदैवच. इंग्लंडचा बचावपटू एझरी कॉन्सा याने घानाचा आक्रमक प्निन्स क्वाबेना आदू याला गोलक्षेत्रात पाडले होते. त्या वेळी आदूचे चेंडूवर नियंत्रण होते आणि त्याला गोलची संधी होती. कॉन्साने आदूला पाडले त्या वेळी कॉन्साचा चेंडूला स्पर्शही झाला नव्हता; मात्र त्यानंतर घानाला पेनल्टी किक देण्यात आली नाही. घानाने पनामाविरुद्ध अखेरच्या मिनिटांतच गोल केला होता. त्याची पुनरावृत्ती या वेळी झाली नाही.