डॅनियल मुनोझच्या गोलमुळे कोलंबियाने वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेत काँगोचे कडवे आव्हान १-० असे परतवले. या बुधवारी पहाटे मिळवलेल्या विजयामुळे कोलंबियाने बाद फेरी निश्चित केली. काँगोचा गोलरक्षक लिओनेल पॅसी याने कोलंबियाचा धडाका रोखला होता; मात्र ७६व्या मिनिटास मिळालेल्या पेनल्टी किकने लढतीचा निर्णय केला.
कोलंबियाने उझबेकिस्तानला ३-१ असे पराभूत करून जोरदार सुरुवात केली होती. त्यांनी काँगोविरुद्धही वर्चस्व राखताना सातत्याने आक्रमण केले; मात्र पॅसी हा कोलंबियाच्या मार्गात अडथळा ठरला. पोर्तुगालला १-१ असे रोखलेल्या काँगोने त्यातच प्रभावी प्रतिआक्रमणे करीत कोलंबियास मुक्त आक्रमणे करण्यापासून रोखले होते. ४७५ यशस्वी पास, गोलचे २० प्रयत्न, गोलक्षेत्रातील ६९ टक्के वर्चस्वानंतरही कोलंबियास पेनल्टी किकनेच आधार दिला.पूर्वार्धात कोलंबियाने गोलसाठी १५ प्रयत्न केले होते. गोलरक्षक सोडल्यास प्रत्येकाने आपले कौशल्य अमलात आणले होते. उत्तरार्धातही कोलंबिया जास्तच आक्रमक होते; मात्र पॅसी आणि सहकारी भक्कम होते. ‘गोल केल्यामुळे मी हिरो होत नाही. हा गोल, हा विजय प्रत्येकाचा आहे,’ असे मुनोझने सांगितले.
कोलंबियाचे मार्गदर्शक नेस्तॉर लॉरेंझ विजयानंतर समाधानी नव्हते. ‘भक्कम बचाव करणाऱ्या संघाविरुद्ध जागा तयार कराव्या लागतात. काही प्रयोग करावे लागतात. फुटबॉलमधील प्रशिक्षणानुसार पूर्णपणे खेळ केल्यास प्रतिआक्रमणाचा धोका वाढतो,’ असा इशारा त्यांनी दिला.