भारतीय महिला संघाला चिंता मधल्या फळीची

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
भारतीय महिला संघाला चिंता मधल्या फळीची
मधल्या फळीतील फलंदाजांचे अपयश आणि खराब क्षेत्ररक्षण... या दोन कळीच्या मुद्यांमुळे भारताची वर्ल्ड कप टी-२० महिला स्पर्धेची मोहीम संकटात आली आहे. अशा प्रकिकूल परिस्थीत गुरुवारी हरमनप्रीत कौरचा भारतीय संघ बांगलादेशविरुद्धच्या सामन्याला सामोरा जात आहे.

चुकांची दुरुस्ती करत मोठा विजय मिळवून निव्वळ धावगती आणखी उंचावण्यावर टीम इंडियाचा भर असेल. स्पर्धेच्या अगदी आदल्यादिवशीपर्यंत स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांचा हरपलेला सूर ही एवढीच चिंता भारतीय संघाला होती; पण आता या दोघींचा खेळ बहरला अन् नव्याच अडचणी समोर आल्या अशी परिस्थिती निर्माण झाली.
स्मृतीने तीन सामन्यांत १५९, तर शेफालीने ९२ धावांचे योगदान दिले. दोघींचा स्ट्राइक रेट १५४ हून अधिक आहे. परंतु या दोघींनी केलेल्या भक्कम पायाभरणीवर त्याच शैलीने डावाची उभारणी करणे मधल्या फळीतील फलंदाजांना जमत नसल्याने संघ व्यवस्थापन चिंतेत आहे.

क्षेत्ररक्षणातही भारतीय संघ कमी पडत आहे. संघातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी असलेल्या राधा यादवकडून द. आफ्रिकेच्या मेरिझान कापचे सुटलेले दोन सोपे झेल भारतीय संघाला महागात पडले होते.

अशी आहे स्थिती

पाकिस्तान, नेदरलँड्सवर मात, तर द. आफ्रिकेविरुद्ध पराभव, यासह भारताचे तीन सामन्यांत चार गुण. अ गटातील टीम इंडियाची निव्वळ धावगती २.५११. सुरुवातीचे दोन सामने सहज जिंकल्याचा भारताला फायदा झाला आहे.

सलग चार विजयासह ऑस्ट्रेलिया महिला संघ (८ गुण, ४.७२४ निव्वळ धावगती) या गटात अव्वल

प्रत्येक गटातून अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करणार

दुसऱ्या क्रमांकासाठी भारताची आता दक्षिण आफ्रिकेशी (४ गुण, -०.५४६ निव्वळ धावगती) चुरस

दक्षिण आफ्रिका संघाने आपले उर्वरित गट सामने जिंकले तर आणखी एका पराभवामुळे भारताला स्पर्धेबाहेर पडावे लागेल! त्यामुळे उपांत्य फेरीसाठी भारतीय संघाने बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवणे महत्त्वाचे आहे.

आजचा सामना

भारत-बांगलादेश

ठिकाण : ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर

प्रक्षेपण : संध्याकाळी ७ पासून स्टार स्पोर्ट्सवर

आमने-सामने : भारताचे २०-३ असे वर्चस्व

खेळपट्टीचा अंदाज : ही खेळपट्टी संतुलित, पारंपरिक खेळपट्टी आहे, जी सुरुवातीला फलंदाजांना अनुकूल असते, पण सामना जसजसा पुढे जातो तसतशी फिरकी गोलंदाजांना अधिक मदत करते. पूर्वी वेग आणि चेंडूला मिळणाऱ्या उसळीसाठी ओळखल्या जाणारी ही खेळपट्टी आता पाटा झाली आहे. हवामानाचा अंदाज : सामन्यादरम्यान तापमान ३१ ते ३२ अंशादरम्यान. आर्द्रतेचे प्रमाणही जास्त. द. आफ्रिकेविरुद्ध अशा हवामानाशी जुळवून घेण्यात भारतीय संघ कमी पडला होता.