गोरेवाड्यातील प्रदूषणावर निर्णय घ्या

महाराष्ट्र टाइम्स
courts important directives on goravada lake pollution
गोरवाडा तलावाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी उपाययोजना करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर महापालिकेला निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. जनहित याचिकेतील मागण्यांना निवेदन (रिप्रेझेंटेशन) मानून त्यांवर गुणदोषांच्या आधारे कायद्यानुसार निर्णय घ्यावा, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

शैलेश रामसुंदर पांडे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेत गोरवाडा तलावात प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडले जात असल्याने पर्यावरण, जलचर सृष्टी आणि सार्वजनिक आरोग्य धोक्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. तलावाचे संरक्षण करण्यासाठी तातडीने उपाययोजना राबविण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती.
न्या. अनिल किलोर आणि न्या. राज वाकोडे यांच्या खंडपीठाने सुनावणीनंतर याचिका निकाली काढताना महापालिकेला महत्त्वाचे निर्देश दिले. याचिकेतील मागण्यांचा प्रतिनिधित्व म्हणून विचार करून त्यावरील निर्णय न्यायालयाच्या आदेशाची प्रत सादर केल्यापासून सहा आठवड्यांच्या आत घ्यावा, असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच याचिकाकर्त्याने एका आठवड्याच्या आत याचिका आणि आदेशाची प्रत मनपाकडे सादर करावी, असेही नमूद करण्यात आले.

महापालिकेने घेतलेला निर्णय त्यानंतर दोन आठवड्यांच्या आत याचिकाकर्त्याला कळविण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले. या आदेशांसह जनहित याचिका निकाली काढण्यात आली.