Farmers Concern Grows Over Third Ring Road Project
तिसऱ्या रिंगरोडबाबत शेतकरी आक्रमक
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
सुमारे १३ हजार ७४८ कोटींच्या तिसऱ्या आउटर रिंगरोड प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे संयुक्त जनसुनावणी घेण्याची मागणी केली आहे. या प्रकल्पाबद्दल स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असल्याने शेतकऱ्यांकडून ही मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात शेतकरी संघर्ष सेनेच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी आणि नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एनएमआरडीए) आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले. प्रकल्पाचा अचूक मार्ग, जमीन संपादन प्रक्रिया, नुकसान भरपाईचे निकष, पुनर्वसन धोरण तसेच किती क्षेत्र बाधित होणार याबाबत शेतकऱ्यांना पुरेशी माहिती देण्यात आलेली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संघटनेनुसार अधिकृत आणि सविस्तर माहितीच्या अभावामुळे विविध गैरसमज पसरले असून शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे. नुकसानभरपाई आणि पुनर्वसनाबाबत स्पष्टता नसल्याने अनेक शेतकऱ्यांमध्ये शेती गमावणार तर नाही ना, अशी भीती आहे. या पार्श्वभूमीवर सर्व बाधित शेतकऱ्यांची संयुक्त बैठक अथवा जनसुनावणी आयोजित करून प्रशासनाने प्रकल्पाची संपूर्ण माहिती द्यावी आणि शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच जमीन संपादनाची प्रक्रिया, नुकसानभरपाईचे स्वरूप आणि पुनर्वसनाच्या तरतुदींबाबत अधिकृत स्पष्टीकरण देण्याचीही मागणी केली आहे.शेतकऱ्यांच्या हरकती व सूचना अधिकृतपणे नोंदवून त्या प्रकल्पाच्या पुढील प्रक्रियेत विचारात घ्याव्यात, असेही निवेदनात म्हटले आहे. य यावेळी सारंग झाडे, दिलीप कुकडे, डॉ. मधुसूदन मेंढे, संजय मेंढे, राजेंद्र केदार, नरेंद्र खदातकर, सुधाकर उमाळे, कैलास ठाकरे, पंकज नागपुरे, प्रकाश वांधे आदी उपस्थित होते.