Katol Mayors Caste Claim Rejected Complaint Upheld By Committee
काटोल नगराध्यक्षांचा जातदावा फेटाळला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
नागपूर : काटोलच्या नगराध्यक्ष अर्चना राहुल देशमुख यांचा कुणबी समाजातील असल्याचा दावा जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने अमान्य केला आहे. उपलब्ध पुरावे आणि अभिलेखांची छाननी केल्यानंतर समितीने हा निर्णय घेतला असून संबंधित प्रमाणपत्र सरकारकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने देशमुख यांनी जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर केला होता. मात्र, त्यांच्या दाव्यावर काही नागरिकांनी आक्षेप घेत समितीकडे तक्रार दाखल केली. अर्जदार तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या जुन्या शालेय नोंदींमध्ये ‘मराठा’ अशी जात नमूद असल्याचा मुद्दा तक्रारदारांनी उपस्थित केला होता. समितीने आपल्या आदेशात नमूद केले की, केवळ नातेवाइकांना मिळालेल्या वैधता प्रमाणपत्राच्या आधारे जातदावा ग्राह्य धरता येत नाही.