मान्सूनने व्यापला महाराष्ट्र

Contributed byमुंबई|महाराष्ट्र टाइम्स
monsoon directly increased rain in maharashtra
मान्सून मंगळवारी मुंबईत दाखल झाल्यानंतर मान्सूनचा गेल्या तीन दिवसांमध्ये जलद प्रवास झाला आहे. संपूर्ण राज्यात बुधवारी मान्सून दाखल झाल्याचे जाहीर करण्यात आले. गुजरात, मध्य प्रदेशाच्या काही भागांमध्येही मान्सून दाखल झाला आहे. सर्वसाधारणपणे १५ जूनपर्यंत मान्सून पूर्ण राज्यात पसरतो. मात्र, आठ जूनपासून मान्सूनचा रखडलेला प्रवास राज्यात २१ जूननंतर सुरू झाल्याने पुढील प्रवास वेगाने करीत २४ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनने व्यापला. पुणे, विदर्भात दमदार पाऊस झाला. नाशिकला गुरुवारी आणि शनिवारी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यात १ ते २४ जून या कालावधीतील पाऊसमानाच्या आकडेवारीचा विचार करता राज्यात अद्याप ६३ टक्के पावसाची तूट आहे. राज्यात सरासरी केवळ ५५.३ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला आहे. सर्वसाधारणपणे राज्यात १ ते २४ जून या कालावधीत १५०.८ मिलिमीटर पाऊस होतो. मंगळवार सकाळी ८.३० ते बुधवारी सकाळी ८.३० या चोवीस तासांमध्ये महाराष्ट्रातील किनारपट्टीच्या काही भागांमध्ये अतितीव्र मुसळधार पावसाची नोंद झाली. तरीही राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाची अजूनही मोठी तूट आहे. राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट, तर २५ जिल्ह्यांमध्ये तीव्र तूट आहे.
गुरुवारपासून सुरू होणाऱ्या एक जुलैपर्यंतच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी असू शकेल, अशी माहिती हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी माणिकराव खुळे यांनी दिली. मान्सूनचा प्रवास सुरू झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत पावसाचा धुमाकूळ मुंबईकरांनी अनुभवला. आठवड्यामध्ये कोकणामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा जोर अधिक असू शकेल, असाही अंदाज आहे. कोकणातील पाऊस खान्देश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील पावसालाही चालना देईल. या भागांमध्ये एक जुलैपर्यंत पाऊस हजेरी लावेल. या पावसाची तीव्रता फारशी नसेल. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्गतील नद्यांना तीन दिवसांत पूर येण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असेही त्यांनी सांगितले.

नाशिक : दाटून आलेल्या ढगांचा अंदाज बांधत हवामान विभागाने जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला असला तरी प्रत्यक्षात पावसाने बुधवारी नाशिककरांना हुलकावणी दिली. सकाळी साडेआठ पर्यंतच्या २४ तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी ११.९ मिलीमीटर, तर शहरात २८.२ मिमी पावसाची नोंद झाली. एकट्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात ४३ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. गुरुवारी आणि शनिवारीदेखील जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. सविस्तर वृत्त...३