The Loss Of Sudhir Bhagat A Talented Officer For Ambedkarite Society
सुधीर भगत यांच्या निधनाने आंबेडकरी समाजाची हानी
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
‘आंबेडकरी समाजात अनेक अधिकारी कार्यरत असले तरी समाजहितासाठी स्वतःला वाहून घेणारे, चळवळीशी निष्ठा राखणारे आणि प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणारे सुधीर भगत यांच्यासारखे अधिकारी अत्यंत दुर्मीळ असतात. त्यांच्या निधनामुळे आंबेडकरी समाजाची मोठी हानी झाली’, अशी भावना विविध मान्यवरांनी व्यक्त केली.
सुधीर भगत यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विदर्भ हिंदी मोरभवन येथील मधुरम सभागृहात आयोजित सभेत मान्यवरांनी त्यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि वैचारिक योगदानाबद्दल विचार व्यक्त केले. नाशिकचे कवी व समीक्षक प्रा. गंगाधर अहिरे यांनी सुधीर भगत यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडून सांगितले. ते कुटुंबवत्सल, सामाजिक कार्यात अग्रेसर, संगीत व साहित्य क्षेत्रातील जाणकार तसेच प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी होते, असे त्यांनी नमूद केले. डॉ. मच्छिंद्र चोरमारे यांनी भगत यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेत त्यांच्या ‘धम्म तथागतांचा’ या कवितासंग्रहावर भाष्य केले. हा संग्रह बुद्धांच्या धम्माला केंद्रस्थानी ठेवून मानवी जीवनाच्या उन्नतीचा मार्ग दाखवणारा असल्याचे त्यांनी सांगितले.ज्येष्ठ नाटककार दादाकांत धनविजय यांनी भगत यांच्या आठवणींना उजळा दिला. राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी तथा त्यांचे सहकारी राज फुले यांनी त्यांच्या वैचारिक, सामाजिक आणि साहित्यिक योगदानाचा गौरव केला. सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, महूचे सदस्य ॲड. माणिकराव सावंग होते. त्यांनी पाली भाषेच्या संवर्धनासाठी सुधीर भगत यांनी केलेल्या संघर्षाचा उल्लेख केला. सामाजिक कार्यकर्त्या छाया खोब्रागडे यांनी प्रास्ताविक केले, तर अशोक जांभुळकर यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. मुंबईचे के. आर. बोढारे आणि त्र्यंबक दुनबळे यांनी भगत यांच्या हृदयस्पर्शी आठवणी जाग्या केल्या. प्रा. राहुल मून यांनीही श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते राजन वाघमारे यांनी केले. यावेळी त्यांनी सुधीर भगत यांच्या अनेक आठवणींना उजळा देत उपस्थितांना भावूक केले. आंबेडकराइट मुव्हमेंट ऑफ कल्चर अँड लिटरेचर, रमाई फाउंडेशन, संबुद्ध महिला संघटना, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे प्रतिष्ठान आदी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले.