Uddhav Thackerays Nagpur Visit Anger Of Shiv Sainiks After Mps Split
उद्धव ठाकरे यांचा २६ला नागपूर दौरा
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार फुटल्यानंतर शिवसैनिकांमध्ये प्रचंड संताप आहे. फुटलेल्या खासदारांमध्ये एक विदर्भातील आहे. या फुटीर खासदारांविरुद्ध रणशिंग फुंकण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विदर्भ दौऱ्यावर येणार असून त्याची सुरुवात नागपूरमधून होणार आहे.
शुक्रवार, २६ जून रोजी ठाकरेंच्या दौऱ्याला नागपुरातून सुरुवात होणार आहे. यासंदर्भात पूर्वतयारीसाठी बुधवारी शिवसेना ठाकरे गटाची नागपुरात रेशीमबाग कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत आगामी दौऱ्याचे नियोजन करून नागपुरात पक्षप्रमुखांचे ऐतिहासिक स्वागत करण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला आहे. या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत, विनायक राऊत, खासदार अनिल देसाई, आमदार मिलिंद नार्वेकर आणि युवा नेते सूरज चव्हाण उपस्थित राहणार आहेत. रेशीमबाग कार्यालयात पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला शिवसेना संपर्क प्रमुख सतीश हरडे, महानगर प्रमुख किशोर कुमेरिया, महिला आघाडी संघटिका सुशीला नायक आणि सुरेखा खोब्रागडे, शहरप्रमुख विक्रम राठोड, हरिभाऊ बानाईत आणि उपशहर प्रमुख पंकज अहिरराव प्रामुख्याने उपस्थित होते.