एका कुटुंबाचे ‘एटीएम’

महाराष्ट्र टाइम्स

Prime Minister Narendra Modi strongly criticized the past Congress government in Puducherry. He stated the region was an 'ATM' for a Delhi family, plagued by corruption and instability. Modi highlighted issues like missing rice from ration shops and delayed salaries. He contrasted this with the current BJP-led government's focus on development and good governance.

एका कुटुंबाचे ‘एटीएम’

‘पुद्दुचेरीमधील काँग्रेसच्या सत्ताकाळात राजकीय अस्थिरता व भ्रष्टाचार ही या प्रदेशाची ओळख ठरली होती. तसेच, दिल्लीतील एका कुटुंबासाठी हा केंद्रशासित प्रदेश म्हणजे एटीएम झाला होता’, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे एका जाहीर सभेत केली.

पंतप्रधानांच्या हस्ते २,७०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. तसेच, काही प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले. ‘तमिळनाडूमध्ये द्रमुकच्या नेतृत्वाखालील सरकारकडून होणाऱ्या आर्थिक घोटाळ्यांची लांबलचक यादी लोक पहात आहेत’, अशी टीकाही त्यांनी केली.

पुद्दुचेरीमध्ये यापूर्वी सत्तेत असणाऱ्या काँग्रेस च्या कारभाराचा पंतप्रधानांनी कठोर शब्दांत समाचार घेतला. ‘त्यावेळी येथील शिधावाटप दुकानांमधून तांदूळ गायब झालेला असे. कर्मचाऱ्यांना विलंबाने वेतन दिले जात असे. गुंड व अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तस्करांचे सर्वत्र राज्य होते’, अशी टीका त्यांनी केली. ‘पुद्दुचेरीच्या विकासाच्या प्रवासात काँग्रेस व द्रमुक हे मोठे अडथळे होते. आता त्याच पक्षांना येथे पुन्हा सत्ता हवी आहे. पुद्दुचेरीने आता पुन्हा त्याच भ्रष्ट व गुंडगिरीच्या काळात पुन्हा जावे का, हा प्रश्न आहे. मात्र येथील नागरिकांना ते नको आहे याची मला खात्री आहे’, असे ते म्हणाले.

‘२०४७पर्यंत पुद्दुचेरी हा विकसित केंद्रशासित प्रदेश व्हायला पाहिजे व हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भाजपचे डबल इंजिन सरकार तुमच्यासोबत आहे. पुद्दुचेरी हे वैद्यकीय पर्यटनाचे प्रमुख केंद्र होऊ शकेल असे मला ठामपणे वाटते. येथे सद्यस्थितीत नऊ वैद्यकीय कॉलेजे आहेत. केंद्र सरकार व येथील सरकारचे एकच उद्दिष्ट असल्याने येथे आता सुशासनासह विकास होत आहे. काही राज्यांना केंद्र सरकारकडून भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष अर्थसाह्य केले जात आहे. परंतु पुद्दुचेरी हा केंद्रशासित प्रदेश असूनही आम्ही त्यात त्याचा समावेश केला आहे’, असे त्यांनी नमूद केले. पुद्दुचेरीत सध्या एआयएनआरसी व भाजपचे आघाडी सरकार असून तेथे या महिन्यात विधानसभा निवडणूक होत आहे.