मराठीचा स्वाभिमान जपण्याची गरज

Contributed byकविवर्य कुसुमाग्रजनगरी|महाराष्ट्र टाइम्स

Marathi language pride needs revival. Maharashtra is forgetting its mother tongue, Marathi, due to English influence. Experts emphasize preserving Marathi's rich history and literary heritage. From ancient texts to Sant Dnyaneshwar and Chhatrapati Shivaji Maharaj, Marathi has faced challenges. Today, the invasion of English from within homes requires a strong defense of Marathi.

मराठीचा स्वाभिमान जपण्याची गरज

इंग्रजीसह इतर भाषांना प्राधान्य देताना महाराष्ट्राला हळूहळू मराठीचा विसर पडत चालल्याचे चित्र दिसत आहे. अस्खलित मराठी बोलणे आणि समजून घेणेही आज कठीण होत चालले आहे. त्यामुळे मराठी भाषेचे शुद्धीकरण आणि तिचा अभिमान नव्याने जागवण्याची वेळ आली असून, माय मराठीवरील परकीय भाषांचे आक्रमण थांबवून मराठीचा स्वाभिमान जपण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन व्याख्याते प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी केले.

चौथ्या विश्व मराठी संमेलनात रविवारी (दि. १) ‘समृद्ध मराठी भाषा’ या परिसंवादात ‘इतिहासातील मराठी’ या विषयावर ते बोलत होते. इंग्रजाळलेल्या युगातही मराठी जिवंत ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक मराठी माणसावर आहे. इतिहासाचा अभ्यास करताना मराठीचाच इतिहास होणार नाही, याची काळजी आपण घेतली पाहिजे, असे ते म्हणाले. बानुगडे-पाटील म्हणाले की, मराठी ही केवळ भाषा नसून महाराष्ट्राच्या इतिहासाची जननी आहे. मराठीच्या प्रवासात आद्यकाळ, मध्ययुगीन काळ आणि शिवकाळ असे टप्पे दिसतात. सातवाहन राजांच्या काळात मराठीचा खऱ्या अर्थाने प्रचार-प्रसार झाला. मराठीतील पहिला ग्रंथ मानली जाणारी ‘गाथा सप्तशती’ही याच कालखंडातील आहे. पुढे यादव राजवटीत मराठी वाङ्मयाची भरभराट झाली. मात्र, इस्लामी आक्रमणांच्या काळात मराठीचा काही प्रमाणात ऱ्हास झाला. या पार्श्वभूमीवर ‘इये मराठीचिये नगरी’ म्हणत संत ज्ञानेश्वरांनी मराठीला नवसंजीवनी दिली. यानंतरच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठीचे मराठीपण जपले. इतिहासात अनेक परकीय आक्रमणे मराठीने झेलली. मात्र, सध्याच्या काळात घरातूनच इंग्रजीचे आक्रमण सुरू झाले आहे. हे आव्हान पेलायचे असेल, तर मराठीशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, असे त्यांनी नमूद केले. यावेळी संजय उपाध्ये यांनी ‘व्यवहारातील मराठी’ या विषयावर मार्गदर्शन केले. शुभदा फडणवीस यांनी सत्राचे निवेदन केले.

ह. भ. प. प्रमोद महाराज जगताप यांनी ‘आध्यात्मातील मराठी’ या विषयावर मार्गदर्शन केले. संत ज्ञानेश्वरांनी सोळाव्या वर्षी सामान्य माणसासाठी गीतेचा अर्थ मराठीत मांडला. मराठीला अभिजात दर्जा अलीकडे मिळाला असला, तरी ज्या दिवशी ज्ञानेश्वरांनी गीता मराठीत लिहिली, त्याच दिवशी मराठीला खऱ्या अर्थाने अभिजातपण प्राप्त झाले, असे त्यांनी सांगितले. संतांनी मराठी घराघरांत पोहोचवली; मात्र आजची पिढी अस्खलित मराठी बोलू शकत नाही, ही खंतही त्यांनी व्यक्त केली.