कराची येथील अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाच्या प्रवेशद्वारावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिस आणि निदर्शकांमध्ये रविवारी झालेल्या संघर्षात किमान दहा जण ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले आहेत.
अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येनंतर ही चकमक सुरू झाली.
‘आतापर्यंत दहा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले आहेत. यातील काहींना गोळ्या लागल्याचे दिसून आले आहे. इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यात खामेनी यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट होताच वाणिज्य दूतावासाच्या इमारतीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर लोक जमू लागले,’ असे सिंध प्रांतातील पोलिस सर्जन डॉ. सुमैया सय्यद यांनी सांगितले. ‘रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये सुमारे ३० जखमींवर उपचार सुरू आहेत,’ असेही सय्यद म्हणाले. ‘जखमींमध्ये चार पोलिसांचाही समावेश आहे,’ असेही त्या म्हणाल्या.
‘जमावाने पोलिसांवर हल्ला करण्यास सुरुवात केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्यांना अश्रुधुराच्या नळकांड्या आणि रबर गोळ्यांचा वापर करावा लागला, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकारी एसएसपी असद रेझा यांनी दिली. पोलिसांनी जमावावर लाठीमारही केला. परंतु नंतर पोलिसांनी गोळीबारही केल्याचे जमावापैकी एकाने नंतर एका टीव्ही चॅनेलला सांगितले. मोठ्या संख्येने निदर्शक वाणिज्य दूतावासाभोवती जमले होते. ते दूतावासात घुसण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला. ‘कोणालाही कायदा हातात घेण्याची परवानगी दिली जाणार नाही,’ अशी माहिती सिंध प्रांताचे गृहमंत्री झिया उल हसन लंगर यांनी दिली.







