कँडी : ‘तुम्ही स्वतः कर्णधारपद सोडणार की, पीसीबी तुम्हाला हटवणार?’, असा थेट प्रश्न एका वार्ताहराने पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार सलमान अली आगा याला विचारला. पाकिस्तानचे वर्ल्ड कप टी-२० क्रिकेट स्पर्धेतील आव्हान सुपर ८ फेरीत संपुष्टात आल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सलमानला तिखट प्रश्न अन् टीकेला सामोरे जावे लागले. ‘आत्ता घेतलेला कोणताही निर्णय भावनिक ठरेल. आम्ही माघारी परतल्यानंतर थोडा वेळ घेऊ आणि मग योग्य तो निर्णय घेऊ’, असे सलमान म्हणाला. प्रशिक्षक माईक हेसन यांच्या मताला महत्त्व दिले जाते, कर्णधार आणि संघनिवडीतही त्यांचाच शब्द अंतिम ठरतो का, असे प्रश्नही सलमानला थेट विचारण्यात आले.
जयसूर्या पायउतार होणार!
कोलंबो : सहयजमान श्रीलंकेचे वर्ल्ड कप टी-२० क्रिकेट स्पर्धेतील आव्हान सुपर ८मध्ये संपुष्टात आल्यानंतर मुख्य प्रशिक्षक सनथ जयसूर्या यांनी पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘माझा करार जूनमध्ये संपत आहे, पण मी त्यापूर्वीच पायऊतार होईन. या निर्णयाबाबत माझे श्रीलंका क्रिकेटशी बोलणे झाले आहे’, असे जयसूर्या म्हणाले.
डच ज्युनिअरमध्ये ब्राँझ
नवी दिल्ली : भारताची बॅडमिंटनपटू शायना मनीमुथू हिने डच ज्युनिअर इंटरनॅशनलमध्ये ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. आशिया बॅडमिंटन १५ वर्षांखालील स्पर्धेत विजेती ठरलेल्या शायनाला उपांत्य फेरीत चीनच्या यी किंग यिन हिच्याकडून १७-२१, ८-२१ असा पराभव पत्करावा लागला.
सविताची माघार
हैदराबाद : अनुभवी गोलकीपर आणि माजी कर्णधार सविता पूनिया हिने खासगी कारणांमुळे वर्ल्ड कप हॉकीच्या पात्रता स्पर्धेतून माघार घेतली आहे. हॉकी इंडियाने रविवारी मिडफिल्डर सलीमा टेटे हिच्याकडे भारताचे नेृतत्व सोपवले. वर्ल्ड कप २०२६ची पात्रता फेरी ८ ते १४ मार्च दरम्यान हैदराबादमध्ये रंगणार आहे. वर्ल्ड कपचे आयोजन ऑगस्टमध्ये बेल्जियम आणि नेदरलँड्स येथे होईल.








