नांदेड - हडपसर ही रेल्वे पूर्वीप्रमाणे पुण्यापर्यंत चालविण्यात यावी. या रेल्वेचा विस्तार होत नसल्यास, पुणे पनवेल मार्गावर नांदेड रत्नागिरी चालविण्यात यावी. अशी मागणी मराठवाडा प्रवासी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी नांदेडच्या रेल्वे अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली.
मराठवाडा प्रवासी महासंघाचे अरुण मेघराज, नारायणराव अकमर, अमित कासलीवाल, परमेश्वर अखाडे यांनी रेल्वेचे अधिकारी सी.एच. कल्याण राजू, कुमार गौरव, श्रीनिवास सुर्यवंशी यांची भेट घेतली. या भेटीत या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करताना सांगितले की, नांदेड-हडपसर दैनंदिन रेल्वेला पूर्ववत पुणे पर्यंत किंवा खडकी पर्यंत चालवा, तसेच पुणे, पनवेल मार्गावरून नांदेड-रत्नागिरी, परभणी मार्गावरून संभाजीनगर-नागपूर तर कल्याण मार्गावरून नांदेड-अहमदाबाद दरम्यान नवीन अमृत भारत एक्स्प्रेस चालविण्यात यावे. तसेच रात्रीच्या वेळी वाशिम-मुंबई दरम्यान नवीन दैनंदिन रेल्वे सुरू करावी. तसेच बेंगलूर-नांदेड दैनंदिन रेल्वेला नागपूर पर्यंत तर, नांदेड-रायचूर-परभणी रेल्वेचा दोन्हीकडून विस्तार करून छत्रपती संभाजीनगर-मैसूर पर्यंत ही रेल्वे चालविण्यात यावी. तसेच पटणा-पूर्णा साप्ताहिक रेल्वेचा विस्तार छत्रपती संभाजीनगर पर्यंत विस्तारण्याच्या मागण्या करण्यात आल्या. तसेच सकाळी नऊ च्या दरम्यानची परभणी-नांदेड पुश-पुल दैनंदिन रेल्वे पूर्ववत सोडण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.







