डॉ. शिंदे यांनी माणसे जोडली

महाराष्ट्र टाइम्स

A book detailing the life of industrialist Dr. Lalasaheb Shinde was released. Dr. Prakash Amte and Dr. Mandakini Amte graced the occasion. Dr. Amte spoke about the medical profession and the need to work for tribal communities. Former MP Shrinivas Patil praised Dr. Shinde's efforts in connecting people. The event highlighted Dr. Shinde's contributions and philanthropic work.

डॉ. शिंदे यांनी माणसे जोडली
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

प्रकाश आणि मंदाकिनी आमटे या दाम्पत्याशी ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी प्रश्नोत्तरे स्वरूपात संवाद साधला. माणसावर अस्वलाने केलेला हल्ल्याच्या प्रसंगाप्रमाणे अनेक प्रसंगी त्यांनी सांगितले. ‘हल्ली डॉक्टरी पेशा बदनाम झाला आहे. चित्रपटामुळे अनेक मेडिकल कॉलेज बोलवतात, तेव्हा हे मी त्या तरुणांना आवर्जुन सांगतो. सध्या हे क्षेत्र बदनाम असून, पुढच्या काळात त्याची स्थिती सुधारण्याची तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे. आपल्याकडे १० कोटी आदिवासी असून, त्यांच्यासाठी समाजाने काम करायला हवे,’ अशी अपेक्षा डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केली.

‘अपार कष्ट घेऊन डॉ. लालासाहेब शिंदे यांनी संस्था काढल्या आणि त्या चांगल्या चालवल्या. आता पुस्तकरूपाने त्यांचे कार्य सगळ्यांपर्यंत पोहोचत आहे. सार्वजनिक स्वरूपात होणारा शिष्याचा होणारा गौरव गुरूसाठी आनंदाचा आहे. शिंदे यांनी त्यांच्या आयुष्यात माणसे जोडण्याचे काम केले,’ असे गौरवोद्गार माजी खासदार श्रीनिवास पाटील यांनी काढले.

ज्येष्ठ उद्योगपती डॉ. लालासाहेब शिंदे यांच्या सफल जीवनाचे पूर्ण सत्य ‘ कर्मण्येवाधिकारस्ते ’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमात प्रसिद्ध नाट्यलेखक आणि निर्माते राजन मोहाडीकर लिखित या पुस्तकाचे प्रकाशन मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. प्रकाश आमटे आणि हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्पाच्या डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रपतीपदक विजेते ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, एल. व्ही. शिंदे ग्रुपचे कार्यकारी संचालक राजेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.

‘पिंपरी-चिंचवड शहर हे पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, भोसरी, निगडी हे पाच गावांचे मिळून झाले. सगळे लोक एकमेकांना मदतीच्या भावनेने विचारपूस करायचे. स्थानिकांनीही सर्वांना साथ दिली. तेव्हा इथे चाळी होत्या. मग प्राधिकरण आले. या शहरात मोठ्या संख्येने सांगली, सातारा, कोल्हापूर, जळगाव, चिपळूण येथून आलेले नागरिक स्थायिक झाले. आता शहर चांगले विकसित झाले आहे. शिंदेंसारख्यांनी आपल्यासोबत इतरांनाही मदत करून मोठे केले,’ असे पाटील म्हणाले.

या वेळी डॉ. शिंदे यांनी महारोगी सेवा समितीला एक लाख ११ हजार १११ रुपयांचा धनादेश दिला. राहुल सोलापूरकर यांनी सूत्रसंचालन केले. अनिल कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. सीमा वाघ यांनी आभार मानले.