टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेतील झिम्बाब्वेचे आव्हान ‘सुपर ८’ साखळीत संपुष्टात आले; मात्र संघाचे भारतातून मायदेशी प्रयाण अनिश्चित आहे. अमेरिका; तसेच इस्रायलवर हल्ला केल्यामुळे आखाती देशांतील विमान सेवा स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे झिम्बाब्वे संघाच्या प्रयाणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सिकंदर रझा कर्णधार असलेल्या झिम्बाब्वे संघातील खेळाडू मूळ कार्यक्रमानुसार सोमवारी सकाळी तीन जथ्थ्यांतून रवाना होणार होते; मात्र संघाचे प्रयाण लांबले असल्याचे प्रशिक्षक जस्टिन सॅमन्स यांनी सांगितले. झिम्बाब्वेच्या संघातील अष्टपैलू ग्रॅमी क्रेमर हा दुबईत राहतो; मात्र तेथील विमानसेवा पूर्ण बंद करण्यात आली आहेत. झिम्बाब्वे संघातील अन्य खेळाडू; तसेच सहायक दुबईमार्गेच रवाना होणार होते.
‘आखातामधील सध्याची परिस्थिती नक्कीच चिंताजनक आहे. या परिस्थितीत नक्कीच खेळाकडे पूर्ण लक्ष केंद्रीत करणे अवघड होते. या सामन्यानंतर आपण खरेच सुरक्षित घरी जाणार का?, असा विचार मनात आल्यास काहीच गैर नाही. सामन्यापूर्वीही त्याची खेळाडूंत चर्चा सुरू होती. मैदानात गेल्यावर जास्त लक्ष खेळावरच असते,’ असे सॅमन्स यांनी नमूद केले.
दुबईचा विमानतळ बंद असल्यामुळे झिम्बाब्वेचा संघ अदिस अबाबामार्गे जाण्याचा पर्याय तपासून बघत आहे. खेळाडू, सहायक; तसेच पंच, तांत्रिक अधिकाऱ्यांच्या प्रवासाच्या पर्यायाचा विचार होत असल्याचे आयसीसीने सांगितले.








