कँडी : ‘तुम्ही स्वतः कर्णधारपद सोडणार, की पीसीबी तुम्हाला हटवणार?,’ असा थेट प्रश्न एका वार्ताहराने पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार सलमान अली आगा याला विचारला. पाकिस्तानचे वर्ल्ड कप टी-२० क्रिकेट स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सलमानला तिखट प्रश्न अन् टीकेला सामोरे जावे लागले. ‘आता घेतलेला कोणताही निर्णय भावनिक ठरेल. आम्ही माघारी परतल्यानंतर थोडा वेळ घेऊ आणि मग योग्य तो निर्णय घेऊ,’ असे सलमान म्हणाला. प्रशिक्षक माईक हेसन यांच्या मताला महत्त्व दिले जाते, कर्णधार आणि संघनिवडीतही त्यांचाच शब्द अंतिम ठरतो का, असे प्रश्नही सलमानला थेट विचारण्यात आले; तसेच तुम्ही प्रशिक्षकाच्या हातातले बाहुले आहात, अशी टिप्पणीही सलमानपुढे करण्यात आली.
जयसूर्या पायउतार होणार
कोलंबो : सहयजमान श्रीलंकेचे वर्ल्ड कप टी-२० क्रिकेट स्पर्धेतील आव्हान ‘सुपर ८’मध्ये संपुष्टात आल्यानंतर मुख्य प्रशिक्षक सनथ जयसूर्या यांनी पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘माझा करार जूनमध्ये संपत आहे; पण मी त्यापूर्वीच राजीनामा देईन. या निर्णयाबाबत माझे श्रीलंका क्रिकेटशी बोलणे झाले आहे,’ असे जयसूर्या म्हणाले. वाणिंदू हसरंगा, मथिशा पथिराना आणि कुशल मेंडिस यांच्या दुखापतींचाही श्रीलंकेला फटका बसला.
गुकेशची बरोबरी
प्राग : जागतिक विजेत्या दोमाराजू गुकेशची प्राग आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महोत्सवातील मास्टर्स स्पर्धेतील विजयाची प्रतीक्षा कायम आहे. त्याला शनिवारी, चौथ्या फेरीत डेव्हिड नॅवारा याच्याविरुद्ध बरोबरी स्वीकारावी लागली. दरम्यान, अरविंद चिदंबरमला व्हिन्सेंट केमरविरुद्ध हार पत्करावी लागली. गुकेशला तिसऱ्या फेरीत पराभूत केलेल्या जॉर्डन व्हॅन फॉरेस्टने चौथ्या फेरीअखेर आघाडी घेतली आहे. गुकेश आणि अरविंद प्रत्येकी दीड गुणांसह संयुक्त सातवे आहेत. दिव्या देशमुखने चॅलेंजर्स स्पर्धेत वॅनक्लाव फिनेकला बरोबरीत रोखले. तिला आघाडीवरील फिनेकला रोखल्याचे समाधान लाभले असेल.
शायनाला ब्राँझ
नवी दिल्ली : भारताची उदयोन्मुख बॅडमिंटनपटू शायना मनीमुथू हिला डच ज्युनिअर इंटरनॅशनल स्पर्धेत ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. आशिया बॅडमिंटन १५ वर्षांखालील स्पर्धेत विजेती ठरलेल्या शायनाला उपांत्य फेरीत चीनच्या यी किंग यिन हिच्याकडून १७-२१, ८-२१ असा पराभव पत्करावा लागला.








