डॉ. श्यामला वनारसे यांचे निधन

महाराष्ट्र टाइम्स

Dr. Shyamala Vanarse, a renowned film critic and psychologist, has passed away at the age of 87. She significantly contributed to literature, music, cinema, and child psychology. Dr. Vanarse received state government awards for her books. She was instrumental in establishing several cultural and educational institutions. Her work impacted various organizations dedicated to education and women's empowerment.

डॉ. श्यामला वनारसे यांचे निधन
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

चित्रपटाचे रसग्रहण कसे करावे, हा संस्कार देणाऱ्या ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक आणि मानसशास्त्रज्ञ डॉ. श्यामला वनारसे (वय ८७) यांचे रविवारी निधन झाले. साहित्य, संगीत, चित्रपट, बालकांचे भावविश्व अशा विविध क्षेत्रांत त्यांनी योगदान दिले. वनारसे यांच्या पश्चात चिरंजीव रंगकर्मी प्रसाद वनारसे, सून लेखिका मृणालिनी वनारसे आणि मुलगी नृत्य कलावंत गौरी वनारसे असा परिवार आहे.

तत्कालीन पुणे विद्यापीठातून एमए (मानसशास्त्र) सुवर्णपदकासह उत्तीर्ण झाल्यानंतर वनारसे यांना विद्यापीठ अनुदान आयोगाची शिष्यवृत्ती मिळाली. त्यांनी पी.एचडी संपादन केली. त्यानंतर सुमारे १९ वर्षे अध्यापन केले. पती दिवंगत डॉ. सुधीर वनारसे यांच्यासमवेत त्यांनी औद्योगिक मानसशास्त्र या विषयासाठी अनेक उद्योगांसमवेत काम केले. या दोघांनी एकत्र लिहिलेल्या ‘ स्वभावाला औषध असते ’ या पुस्तकाला; तसेच ‘सत्यजित राय आणि भारतीय मन्वंतर’ या पुस्तकाला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला. इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषेत त्यांनी विपुल साहित्यनिर्मिती केली. गरवारे बालभवन, कलाछाया सांस्कृतिक केंद्र, अक्षरनंदन अशा अनेक संस्थांच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा होता.

डॉ. वनारसे यांनी अनेक राष्ट्रीय परिषदांमधून शोधनिबंध सादर केले. अनेक नियतकालिकांमधून स्फुट लेखन केले. डॉ. वनारसे यांनी प्राथमिक शिक्षण मंडळ, राज्य मराठी विकास परिषद, महाराष्ट्र पालक शिक्षक संघ, नारी समता मंच, गरवारे बालभवन आदी संस्थांमध्ये काम केले.