स्फोटात १८ श्रमिकांचा मृत्यूू

महाराष्ट्र टाइम्स

A devastating blast rocked SBL Energy Limited in Raulgav, Kalmeshwar taluka, on Sunday morning. The explosion claimed the lives of 18 workers, including 14 women, and left another 18 critically injured. The incident occurred in the detonator manufacturing unit. Authorities have ordered a thorough investigation into the cause of the blast.

स्फोटात १८ श्रमिकांचा मृत्यूू
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

कळमेश्वर तालुक्यातील राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड या कंपनीत रविवारी सकाळी ७ ते ७.३० वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत १८ श्रमिकांचा मृत्यू झाला, तर १८ श्रमिक गंभीर जखमी झाले. जखमींवर स्थानिक ऑरेंज सिटी हॉस्पिटल आणि ए स्क्वेअर हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. मृत्यू झालेल्या श्रमिकांत १४ महिला कामगारांचा समावेश आहे.

प्राप्त माहितीनुसार, एसबीएल एनर्जी लिमिटेड ही कंपनी प्रामुख्याने खाणकाम आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी लागणारी औद्योगिक स्फोटके आणि डिटोनेटर्सची निर्मिती करते. रविवारी सकाळी कंपनीत नेहमीप्रमाणे काम सुरू असताना अचानक डिटोनेटर तयार करण्याच्या युनिटमध्ये स्फोट झाला. श्रमिक अंतिम टप्प्यातील क्रिम्पिंग प्रक्रिया करीत असताना जोरदार आवाज होऊन झालेल्या या स्फोटाचा आवाज परिसरात कित्येक किलोमीटरपर्यंत ऐकू आला. याबाबत सांगताना पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार म्हणाले, ‘एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीत झालेल्या स्फोटात १६ जणांचा मृत्यू झाला आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून प्रशासनाकडून सखोल चौकशीचा आदेश देण्यात आला आहे.’

या स्फोटामुळे पुन्हा एकदा स्फोटक निर्माण करणाऱ्या कंपन्यांमधील औद्योगिक सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या स्फोटाची गंभीर दखल घेऊन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशीचे आदेश दिला आहे. त्यानुसार, पोलिस प्रशासन, पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संस्था (पेसो), औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालय (डिश) यांच्याद्वारे चौकशी सुरू आहे. कंपनीतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसर, नॉन-इलेक्ट्रिक डिटोनेटर याला उद्योगविश्वात ‘नॉन-नेल’ असेही म्हटले जाते. यात स्फोट घडवण्यासाठी विजेचा वापर न करता शॉक वेव्ह किंवा गॅस प्रेशरचा वापर केला जातो. खाणकाम, बोगदे तयार करणे आणि बांधकामांमधील नियंत्रित स्फोटांसाठी याचा प्रामुख्याने वापर होतो, अशी माहिती कंपनीतील अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, प्लांटमध्ये हा स्फोट कसा झाला, याबाबत कंपनी निरुत्तर आहे. परिणामत: वारंवार होणाऱ्या अशा प्रकारच्या स्फोटांचे ऑडिट करण्याची मागणी होऊ लागली आहे.

अचानक झालेल्या स्फोटाची माहिती मिळताच श्रमिकांच्या कुटुंबीयांनी कंपनीच्या दिशेने धाव घेतली. त्या वेळी कुटुंबीयांना कंपनीच्या प्रवेशद्वारावर थांबविण्यात आले. घटनेच्या सहा तासांपर्यंत कुणाच्या नातेवाइकाचा मृत्यू झाला, याबाबत कुठलीही माहिती कंपनी वा प्रशासनाने जाहीर केली नव्हती. त्यामुळे प्रवेशद्वारावर श्रमिकांचे कुटुंबीय; तसेच परिसरातील गावकऱ्यांनी गर्दी केली होती. दुपारी एक वाजतादरम्यान प्रशासनाने श्रमिकांच्या कुटुंबीयांना डीएनए चाचणीसाठी बोलाविण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांना आपले कुटुंबीय दगावले असावे, याबाबतची पुसटशी कल्पना आली. तोपर्यंत तब्बल सहा तास कुटुंबीय या भीषण घटनेबाबत अनभिज्ञ होते.