इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर जम्मू-काश्मीरमध्ये उसळलेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री अब्दुल्ला यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया मंचावर पोस्टमध्ये म्हटले, ‘इराणमधील घडामोडी आणि खामेनी यांच्या हत्येच्या वृत्ताने मी अत्यंत चिंतेत आहे. सर्व समुदायांनी संयम राखून शांतताभंग होईल असे कोणतेही कृत्य करू नये.’
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात मृत्यू झाल्याच्या वृत्ताने भारतात तीव्र पडसाद उमटले आहेत. काश्मीरपासून कर्नाटकपर्यंत शिया समुदायाने रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध नोंदवला असून, अनेक राज्यांमध्ये तीन दिवसांचा शोक जाहीर करण्यात आला आहे. शनिवारी तेहरानवर झालेल्या संयुक्त हल्ल्यात खामेनी यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी इराणी प्रसारमाध्यमांनी रविवारी केली.
या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमधील लाल चौक, बुडगाम, अनंतनाग आणि पुलवामा यांसारख्या भागात निदर्शने करण्यात आली. सुमारे १५ लाख शिया लोकसंख्या असलेल्या या खोऱ्यात आंदोलकांनी अमेरिका आणि इस्रायलविरोधी घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला. लखनौमध्ये ‘बारा इमामबाडा’ येथे मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते. ‘ऑल इंडिया शिया पर्सनल लॉ बोर्डा’चे सरचिटणीस मौलाना यासूब अब्बास यांनी ट्रम्प, नेतान्याहू यांच्या पुतळ्यांचे दहन करण्याची घोषणा केली आहे.








