पुणे : अमेरिका आणि इराण यांच्यात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी संवेदनशील भागांत विशेष बंदोबस्त ठेवला आहे. महत्त्वाची धार्मिक स्थळे, सार्वजनिक गर्दीची ठिकाणे; तसेच परदेशी विद्यार्थ्यांची वस्ती असलेल्या परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे.
शहरातील इराणी विद्यार्थी व नागरिकांची संख्या लक्षात घेऊन विविध शैक्षणिक संस्थांशी संपर्क साधण्यात आला आहे. संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ पोलिसांना कळविण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, इराणी नागरिकांचा व्हिसा संपत असल्यास आपत्कालीन परिस्थितीत मुदतवाढ देण्यासाठी प्रयत्न असणार आहे.
‘अमेरिका मुर्दाबाद’च्या घोषणा
इराणचे सर्वोच्च नेते आणि शिया पंथाचे धर्मगुरू अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्तानंतर शहरात शिया समाजाच्या वतीने शोकसभांचे आयोजन करण्यात आले. या वेळी कोंढवा परिसरात रविवारी नागरिकांनी ‘अमेरिका मुर्दाबाद’ अशा घोषणा देण्यात आल्या.








